विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा रंगभूमीवर

By Admin | Updated: September 21, 2016 02:37 IST2016-09-21T02:37:16+5:302016-09-21T02:37:16+5:30

विदर्भातले प्रश्न रंगभूमीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवण्यासाठी अखिल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत.

The sadness of the farmers of Vidarbha | विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा रंगभूमीवर

विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा रंगभूमीवर

राज चिंचणकर,

मुंबई- चंद्रपूर या मायभूमीतल्या रंगमंचावर विशिष्ट स्थान निर्माण केल्यावर तिथले काही रंगकर्मी विदर्भातले प्रश्न रंगभूमीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवण्यासाठी अखिल महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यानुसार विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा हे रंगकर्मी रंगमंचावर दृश्यमान करणार आहेत. मुंबईच्या रंगभूमीवरून त्याचा प्रारंभ करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
रंगकर्मी संगीता टिपले व अनिरुद्ध वनकर हे दोघे वैदर्भीय रंगभूमी गाजवत असतानाच तिथल्या समस्यांनी त्यांच्या मनात घर केले. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रंगभूमीच्या माध्यमाचा उपयोग का करून घेऊ नये, असा विचार त्यांच्या मनात निर्माण झाला आणि तो प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांनी घाट घातला. त्यानुसार भूमिहीन शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित ‘ठलवा’ या नाट्यकृतीने जन्म
घेतला. भूमिहीन शेतकऱ्यांना विदर्भात ‘ठलवा’ असे संबोधले जाते आणि या विषयावर याच नावाची मनोहर पाटील यांची कादंबरी गाजलेली आहे. संगीता टिपले हिने याच कादंबरीचे नाट्यरूपांतर व दिग्दर्शन करून तिला नाट्यस्वरूप दिले आहे. अनिरुद्ध वनकर याने या नाटकाची निर्मिती व्यवस्था व संगीताची जबाबदारी घेतली आहे. या दोघांनी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा (एनएसडी) येथे नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतले असून, ‘एनएसडी’तर्फे भारतात जे विविध महोत्सव आयोजित करण्यात येतात, त्यात या दोघांनी सहभाग नोंदवला आहे.
>शेतकऱ्यांनी किती वर्षे दुसऱ्यांच्या जमिनीवर राबायचे, असा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांकडे स्वत:ची हक्काची जमीन असायला हवी, यासाठी त्यांनी केलेला संघर्ष या नाटकात मांडण्यात आला आहे.
‘लोकजागृती’ ही नाट्यसंस्था मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत या नाटकाचे प्रयोग करणार आहे. महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांमध्ये नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांना यात संधी देण्यात आली आहे.
‘एनएसडी’ तसेच विविध विद्यापीठांतून नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी आज व्यावसायिकदृष्ट्या मालिका किंवा चित्रपटांमध्ये चमकत असले, तरी रंगभूमी हा त्यांचा श्वास
आहे आणि त्याचे प्रतिबिंब या प्रयोगात पडलेले दिसणार आहे.

Web Title: The sadness of the farmers of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.