Bigg Boss 19 च्या 'या' स्पर्धकाचं रितेश देशमुखनं केलं कौतुक; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:41 IST2025-12-29T09:41:33+5:302025-12-29T09:41:54+5:30
अभिनेता रितेश देशमुखनं 'बिग बॉस १९'च्या एका स्पर्धकाचं भरभरून कौतुक केलं आहे.

Bigg Boss 19 च्या 'या' स्पर्धकाचं रितेश देशमुखनं केलं कौतुक; म्हणाला...
'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असून 'बिग बॉस'चा मोठा चाहतावर्ग आहे. अलिकडेच 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले पार पडला. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता गौरव खन्नाने यंदाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तर फरहाना भट्ट या सीझनची उपविजेती ठरली. दरम्यान, या पर्वात एक मराठमोळा चेहरा देखील पाहायला मिळाला.तो म्हणजे स्टॅंडअप कॉमेडियन प्रणित मोरे. महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे या पर्वाचा विजेता होईल असं अनेकांना वाटलं होतं, मात्र, टॉप ३ मध्येच त्याला समाधान मानावं लागलं. अशातच 'बिग बॉस मराठी ६'चा होस्ट आणि सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुखनं 'बिग बॉस १९'च्या एका स्पर्धकाचं भरभरून कौतुक केलं आहे.
नुकताच 'रिलायन्स फॅमिली डे' हा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रितेश देशमुखनं हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव खन्ना करत होता. News 18 च्या वृत्तानुसार याच मंचावर बोलताना रितेश देशमुखने गौरवच्या 'बिग बॉस'मधील प्रवासावर भाष्य केले. रितेश म्हणाला, "सतत बदलणारा खेळ, थरार आणि हाय-व्होल्टेज ड्रामा असलेल्या यंदाच्या 'बिग बॉस १९' मध्ये गौरव खन्ना त्याच्या वेगळ्या शैलीमुळे उठून दिसला".
गौरवच्या स्वभावाचे कौतुक करताना रितेश पुढे म्हणाला, "अनेक कठीण प्रसंगातही गौरवने जो संयम आणि शांत स्वभाव दाखवला, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच तो या शोचा खरा आणि पात्र विजेता आहे". दरम्यान, 'बिग बॉस'ची ट्रॉफी पटकावल्यापासून गौरव सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत आहे.
रितेशच्या 'बिग बॉस मराठी ६'साठी चाहते उत्सुक
'बिग बॉस हिंदी'नंतर आता 'बिग बॉस मराठी' कधी सुरू होणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर 'बिग बॉस मराठी ६' हे नवं पर्व नववर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ११ जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी ६' सुरू होणार आहे. यंदा शोच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता 'बिग बॉस मराठी ६' प्रेक्षकांना पाहता येणार आहे.