रितेश देशमुखच्या आयुष्यातील सर्वात मोठा 'टर्निंग पॉईंट' कोणता? म्हणाला "ज्यामुळे आयुष्याची..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:25 IST2026-01-07T11:25:34+5:302026-01-07T11:25:49+5:30
रितेश देशमुखने सांगितला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट, 'त्या' एका संधीने पलटलं नशीब!

रितेश देशमुखच्या आयुष्यातील सर्वात मोठा 'टर्निंग पॉईंट' कोणता? म्हणाला "ज्यामुळे आयुष्याची..."
Riteish Deshmukh Life Turning Point : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा लाडका अभिनेता, दिग्दर्शक आणि आता 'बिग बॉस मराठी'चा होस्ट असलेला रितेश देशमुख सध्या चर्चेत आहे. लवकरच तो 'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ११ जानेवारीपासून कलर्स मराठीवर रात्री ८ वाजता प्रेक्षकांना 'बिग बॉस मराठी ६' हा नवा सीझन पाहता येणार आहे. यंदा 'बिग बॉस मराठी'चं घर नव्या रूपात, नव्या रचनेत आणि नव्या खेळाच्या नियमांसह सादर होत आहे. "दार उघडणार... नशिबाचा गेम पालटणार!" या रोमांचक थीमसह घर सज्ज असून, प्रत्येक दारामागे एखादं आव्हान, धक्का किंवा नशीब बदलणारा क्षण दडलेला असेल. यातच होस्ट रितेश देशमुखने त्याच्या आयुष्यातील अशा एका खास क्षणाबद्दल खुलासा केलाय, ज्यामुळे त्याच्या संपूर्ण आयुष्याला कायमचं एक वेगळे वळण मिळाले.
रितेशनं राजश्री मराठीशी बोलताना त्याच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' बद्दल सांगितलं. तो म्हणाला, "प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतोच, ज्यामुळे आयुष्याची दिशा बदलते. माझं शिक्षण आर्किटेक्चरमधून झालं. मी आर्किटेक्ट आहे. स्वतःचं ऑफिसही सुरू केलं होतं. मी कामही करत होतो. पण, मला एका हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून माझ्या आयुष्याची दिशाच बदलली. माझ्यासाठी नशिबाचं दार जर काही असेल, तर ती मिळालेली संधी होती".
रितेश देशमुखने २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर रितेशनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिथून सुरू झालेला हा प्रवास आज यशस्वी अभिनेता आणि 'वेड' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दिग्दर्शकापर्यंत येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्तानं रितेशला त्याची जीवनसाथी मिळाली. या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश देशमुख यांची ऑनस्क्रिन जोडी पहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या शुटिंदरम्यानचं दोघांमध्ये प्रेम फुललं आणि काही वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. रितेश देशमुख हा आज जरी बॉलिवूड अभिनेता असला तरीही तो लहानाचा मोठा राजकीय पार्श्वभूमीत झाला. त्यांचे वडील विलासराव देशमुख बरीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.