Shatak Movie Review: 'लोकमान्यां'चा मंत्र आणि 'डॅाक्टरां'चे तंत्र; कसा आहे 'शतक' सिनेमा?
By संजय घावरे | Updated: February 22, 2026 13:17 IST2026-02-22T13:15:44+5:302026-02-22T13:17:10+5:30
हा चित्रपट केवळ एका संघटनेची गोष्ट नसून, देशप्रेम, तत्त्वनिष्ठा आणि समाजबांधवांना एकत्र आणणाऱ्या विचारधारेच्या शतक महोत्सवी वाटचालीचा इतिहास आहे. वाचा सिनेमाचा रिव्ह्यू

Shatak Movie Review: 'लोकमान्यां'चा मंत्र आणि 'डॅाक्टरां'चे तंत्र; कसा आहे 'शतक' सिनेमा?
हा चित्रपट केवळ एका संघटनेची गोष्ट नसून, देशप्रेम, तत्त्वनिष्ठा आणि समाजबांधवांना एकत्र आणणाऱ्या विचारधारेच्या शतक महोत्सवी वाटचालीचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही राजकारणापासून दूर राहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवलेला विश्वास, संयम आणि वचनबद्धता दिग्दर्शक आशिष मॉल अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे माहितीपटासारखी सादर केली आहे.
कथानक : डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या बालपणापासून चित्रपट सुरू होतो. तरुणपणी कोलकात्याला जाणे, तिथे वास्तव्य करणे, बंगाली शिकणे, स्वातंत्र्यसंग्रामात झोकून देणे, नागपूरमध्ये परतल्यावर अविवाहित राहून देशसेवा करण्याचा विचार करणे, काँग्रेसमध्ये काम करण्याचा हेडगेवारांचा प्रवास पाहायला मिळतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांसोबतच्या भेटीत हेडगेवारांना राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र मिळतो. त्यामुळे ते भारतीय समाज बांधवांच्या एकजूटीसाठी प्रयत्न करतात, पण काँग्रेसमध्ये राहून ते शक्य होत नाही. इथूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होते आणि पुढे हेडगेवार व माधव गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संघाचा प्रवास पाहायला मिळतो.
लेखन-दिग्दर्शन : कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन पटकथा लिहिली आहे. समाजकारण, राजकारण, देशभक्ती, देशावरील संकटे, वादग्रस्त मुद्दे, दंगली, महात्मा गांधींची हत्या, संघावरील बंदी, हेडगेवार-गोळवलकर गुरुजींचा तुरुंगवास, महायुद्धाच्या काळातील परिस्थिती दाखवताना संघाचे कार्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. हेडगेवारांनी मांडलेली संघाची राजकारण आणि समाजकारणाबाबतची भूमिका आजही कशी ठाम आहे हे दाखवले आहे. संवाद अतिशय मार्मिक असून, गीतरचना अर्थपूर्ण आहेत. सुखविंदर सिंगच्या 'जय जय हिंदुस्थान...' या गाण्यासह इतर गाणी देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलीत करणारी आहेत. 'अटॅक इज बेस्ट डिफेन्स' या मंत्राचा कशा प्रकारे योग्य वापर केला जाऊ शकतो ते पाहायला मिळते.
अभिनय : डॅा. हेडगेवारांपासून गोळवलकर गुरुंजींपर्यंत सर्वच व्यक्तिरेखा हुबेहूब वाटाव्यात अशाप्रकारे सादर केल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हीएफएक्स आणि सीजीआयद्वारे हे शक्य करून दाखवले आहे. वास्तवात कलाकार नसल्याने संवादफेकीतील उतार-चढाव अनुभवता येत नाही. व्यक्तिरेखांसोबतच ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण सुरेख आहे.
सकारात्मक बाजू : संकल्पना, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, तंत्रज्ञान, वातावरण निर्मिती, गीत-संगीत
नकारात्मक बाजू : संथ गती, माहितीपटाचा फील, तंत्रज्ञानाला येणाऱ्या मर्यादा
थोडक्यात काय तर हा चित्रपट जरी एखाद्या सामाजिक संघटनेच्या गौरवशाली शतक महोत्सवी वाटचालीवर आधारलेला असला तरी विचारांचा ज्ञानयज्ञ प्रज्ज्वलित ठेवण्यासाठी कशाप्रकारे आहुती द्यावी लागते हे जाणण्यासाठी पाहायला हवा.