Maa Review : मुलीसाठी जेव्हा आई बनते काली'मा'ता, कसा आहे काजोलचा सिनेमा? वाचा रिव्ह्यू
By संजय घावरे | Updated: June 29, 2025 09:49 IST2025-06-29T09:48:38+5:302025-06-29T09:49:22+5:30
रूढी-परंपरेविरोधात एका 'मा'तेचा एल्गार, प्रत्येक आईने पाहावा असा चित्रपट

Maa Review : मुलीसाठी जेव्हा आई बनते काली'मा'ता, कसा आहे काजोलचा सिनेमा? वाचा रिव्ह्यू
भयपटातील रहस्य अखेरपर्यंत कायम राखत कथानकाला न्याय देण्याची हातोटी असणाऱ्या दिग्दर्शक विशाल फुरीयाने या चित्रपटाच्या रूपात क्षणाक्षणाला धक्कातंत्र देणारा पौराणिक भयपट सादर केला आहे. हा चित्रपट आई-मुलीच्या रहस्यमय प्रवासावर आधारलेला आहे. एक आई मुलीच्या बचावासाठी काय करू शकते, हे काजोलने या मायावी थ्रिलरमध्ये सशक्त अभिनयाद्वारे दाखवले आहे.
कथानक : मूळची चंद्रपूर गावातील असलेली अंबिका, पती शुभंकर आणि त्यांची मुलगी श्वेताची ही गोष्ट आहे. घरी मुलीचा बळी देण्याची परंपरा असल्याने आपल्याला मुलगी असल्याचे शुभंकर कुटुंबियांपासून लपवून ठेवतो. वडीलांचे निधन झाल्याने त्याला गावी जावे लागते. तिथून परतत असताना त्याचेही निधन होते. गावचा सरपंच अंबिकाला शुभंकरचा राजवाडा विकण्यासाठी गावी बोलावतो. श्वेताही तिच्यासोबत हट्टाने गावी जाते. श्वेता व अंबिका गावी पोहोचल्यावर घडणाऱ्या विचित्र घटनांचा उलगडा चित्रपटात होतो.
लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची वनलाईन चांगली असून, पौराणिक कथेचा संदर्भ देत उभारलेला डोलारा उत्सुकता वाढवणारा आहे. काही संवादांमध्ये बंगाली बोलीभाषेचा लहेजा बळजबरीने घुसवण्याची गरज नव्हती. राक्षस आणि दैवीशक्तीची ही आजच्या युगातील कथा अखेरपर्यंत खिळवून ठेवते. आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते त्याचे यथार्थ चित्रण चित्रपटात आहे. रक्तबीज राक्षसाच्या कथेची सांगाड चित्रपटात चांगल्या प्रकारे घातली गेली आहे. व्हीएफक्स आणखी चांगले असायला हवे होते. गीत-संगीत व सिनेमॅटोग्रानी चांगली आहे. क्लायमॅक्समधली काही अॅक्शन दृश्ये पटत नाहीत.
अभिनय :काजोलने सशक्त अभिनयाच्या बळावर चित्रपटाचा भार खांद्यावर उचलला आहे. अंबिकाच्या व्यक्तिरेखेसोबतच एका आईच्या भाव-भावनांना तिने सुरेख न्याय दिला आहे. रोनित रॅायने रंगवलेली व्यक्तिरेखा त्याच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी असून, मनाचा थरकाप उडविणारी आहे. इंद्रनील सेनगुप्ताने चांगले काम केले असले तरी काजोलसोबत त्याची केमिस्ट्री जुळत नाही. श्वेताच्या भूमिकेत खेरीन शर्माने सुरेख रंग भरले असून, काजोलच्या साथीने तिने जणू जादूच केली आहे. गोपाल सिंह बऱ्याच दिवसांनी हिंदीत दिसले. इतर कलाकारांनीही अचूक साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : व्हीएफएक्स, सिनेमाची गती
थोडक्यात काय तर एक आई आपल्या मुलांना वाचविण्यासाठी काय करू शकते हे दाखवणारा हा चित्रपट एकदा तरी अवश्य पाहायला हवा. जय महाकाली...