Jawan Review: कमाल! न पाहिलेला SRK, अ‍ॅक्शनचा डबल धमाका; वाचा जबरा 'जवान'ची पैसा वसूल स्टोरी

By संजय घावरे | Published: September 7, 2023 02:39 PM2023-09-07T14:39:09+5:302023-09-07T14:54:56+5:30

Jawan Movie Review: जाणून घ्या कसा आहे, शाहरूख खानचा जवान चित्रपट?

Jawan Movie Review : read this review of Shahrukh Khan's 'Jawaan' which is a double blast of action. | Jawan Review: कमाल! न पाहिलेला SRK, अ‍ॅक्शनचा डबल धमाका; वाचा जबरा 'जवान'ची पैसा वसूल स्टोरी

Jawan Review: कमाल! न पाहिलेला SRK, अ‍ॅक्शनचा डबल धमाका; वाचा जबरा 'जवान'ची पैसा वसूल स्टोरी

Release Date: May 12,2024Language: हिंदी
Cast: शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियमणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, गिरीजा ओक, संजय दत्त, संगीता भट्टाचार्य, एजाज खान, लहेर खान, स्मिता तांबे, ओमकार माणिकपुरी
Producer: गौरी खान, गौरव वर्माDirector: अ‍ॅटली कुमार
Duration: २ तास ४९ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

>> संजय घावरे

'शानदार जबरदस्त झिंदाबाद!!' हा 'मांझी'मधील डायलॉग या चित्रपटासाठी चपखल बसणारा आहे. दिग्दर्शक अ‍ॅटलीने दक्षिण आणि उत्तरेचा सुरेख मेळ घडवत वर्तमानकाळातील मुद्द्यांवर मनोरंजनाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे. गुद्याच्या भाषेत मुद्द्याचं सांगताना मनोरंजक मसाल्यांचाही भरपूर वापर करण्यात आला आहे. शाहरूख खानच्या रूपात जणू भारतीय रॉबिनहुडचा डबल धमाकाच पाहायला मिळतो.

कथानक : चित्रपटाच्या सुरुवातीला चेहऱ्याला बँडेज गुंडाळलेली व्यक्ती आणि सहा तरुणी मेट्रो हायजॅक करतात. ट्रेनमधील साडे तिनशेंहून अधिक लोकांना ओलीस ठेवतात. रेस्क्यू एक्सपर्ट पोलिस अधिकारी नर्मदा रायच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांना बोलावतात. त्यांच्या मार्फत बिझनेसमन काली गायकवाडकडून ४० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळतात. ते सर्व पाहूनही ट्रेनमधील प्रवासी रेस्क्यूसाठी आलेल्या पोलिसांना मदत करण्याऐवजी अपहरणकर्त्यांनाच साथ देतात. इथूनच खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी संघर्ष करणारा भारतीय रॉबिनहूड आणि सहा तरुणींची कहाणी सुरू होते. पुढे एक नव्हे, चक्क दोन नायक शक्तीशाली खलनायकाच्या नाकी नऊ आणतात.

लेखन-दिग्दर्शन : एस. रमणगिरीवासन यांच्या साथीने चित्रपटाचं लेखन करताना अ‍ॅटलीने कर्जबाजारी शेतकऱ्यांवरील अत्याचार, सरकारी रुग्णालयांची दूरावस्था, सैनिकांच्या जीवांशी खेळणारा शस्त्र घोटाळा, इव्हीएम मशीन्स, मतदानासाठी आवाहन आदी महत्त्वाचे मुद्दे सादर केले आहेत. त्यामुळे चित्रपट सुरू झाल्यानंतर पहिल्या दहा मिनिटांमध्येच सकारात्मक मेसेज देतो आणि पुढे कोणता मुद्दा येईल याबाबत कुतूहल वाढतं. नायकाच्या दुहेरी भूमिकेचा अचूक वापर केला असून, चित्रपटाच्या सुरुवातीपासून खलनायकाचा दरारा जाणवतो. 'बेटे को हाथ लगाने से पहले...'सारखे काही संवाद आणि नायक-खलनायकाची एंट्री टाळ्या-शिट्ट्यांची बरसात करते. चित्रपटातील  'जिंदा बंदा...' या गाण्यासोबतच इतर गाणीही चांगली झाली असून, कोरिओग्राफीही सुरेख आहे. अ‍ॅक्शनचा थरारही यात अनुभवायला मिळतो. सैनिक आणि जेलरचा गेटअप पाहिल्यावर या डिपार्टमेंटमध्ये काही उणीवा राहिल्याचं जाणवतं. बाकी हा चित्रपट पैसा वसूल मनोरंजन आहे.

अभिनय :शाहरुख खानने कमालीचा नायक रंगवला आहे. देहबोलीपासून संवादफेकीपर्यंत एक वेगळाच एसआरके दिसतो. त्याच्या तोडीस तोड असलेली नायिका नयनताराच्या रूपात आहे. विजय सेतुपती जरी साऊथचा अ‍ॅक्टर असला तरी हिंदीतही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने रंगवलेला खलनायक मनाचा थरकाप उडवणारा आहे. सान्या मल्होत्रा, लहेर खान, गिरीजा ओक, प्रियमणी, संगीता भट्टाचार्य यांनी आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय दिला आहे. दीपिका पदुकोणने छोट्याशा भूमिकेतही अचूक रंग भरले आहेत. क्लायमॅक्सपूर्वीची संजय दत्तची एंट्री आणि त्याची स्टाईल लक्षवेधी आहे. इतर सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे.

सकारात्मक बाजू : उत्कंठावर्धक पटकथा, संवाद, अ‍ॅक्शन, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी, कोरिओग्राफी
नकारात्मक बाजू : सहा मुलींपैकी चौघींची पार्श्वभूमी समजत नाही, गेटअप, लांबी
थोडक्यात : या चित्रपटात मांडलेले सर्व मुद्दे सर्वसामान्यांच्या मनातील आहेत. यावर कोणीतरी बोलणं गरजेचं होतं. हे काम 'जवान'ने हाती घेतल्याने एकदा तरी हा चित्रपट अवश्य पाहायला हवा.

 

Web Title: Jawan Movie Review : read this review of Shahrukh Khan's 'Jawaan' which is a double blast of action.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.