भर पावसातही प्रेक्षकांनी दिला प्रतिसाद
By Admin | Updated: September 17, 2016 01:31 IST2016-09-17T01:31:59+5:302016-09-17T01:31:59+5:30
रसिक आपल्या आवडत्या कलाकारांवर किती प्रेम करतात याचा अनुभव नुकताच अभिनेता सिद्धार्थ जाधवला आला. सिद्धार्थच्या ‘गेला उडत’ या नाटकाचा प्रयोग कर्नाटकमधील उगार येथे काही दिवसांपूर्वी झाला

भर पावसातही प्रेक्षकांनी दिला प्रतिसाद
रसिक आपल्या आवडत्या कलाकारांवर किती प्रेम करतात याचा अनुभव नुकताच अभिनेता सिद्धार्थ जाधवला आला. सिद्धार्थच्या ‘गेला उडत’ या नाटकाचा प्रयोग कर्नाटकमधील उगार येथे काही दिवसांपूर्वी झाला. या प्रयोगासाठी सिद्धार्थ तिथे सकाळी पोहोचला त्यावेळी वातावरण खूपच चांगले होते. पण संध्याकाळनंतर प्रचंड पाऊस पडायला लागला. या पावसातही लोकांनी संपूर्ण प्रयोग पाहिला. याविषयी सिद्धार्थ सांगतो, ‘संध्याकाळपासूनच खूपच जोरात पाऊस पडत होता. पाऊस थांबेल असे थोडेही वाटत नव्हते. एका भल्या मोठ्या मैदानात प्रयोग होणार होता आणि जवळजवळ पाच हजार लोक प्रयोगासाठी आले होते. त्यामुळे काहीही करून प्रयोग करायचा असे आम्ही ठरवले. मैदानातले सगळे पाणी काढून त्यावर ताडपत्री टाकण्यात आली. लोकांनी छत्र्या घेऊन, ताडपत्री डोक्यावर घेऊन संपूर्ण प्रयोग भिजत पाहिला. आम्हीदेखील मध्यांतर न घेता संपूर्ण नाटक केले. नाटक संपल्यावर मी सगळ्या रसिकांचे आभार मानले. प्रसाद कांबळी, केदार शिंदे आणि आमच्या संपूर्ण टीमने इतक्या महिन्यापासून घेत असलेल्या मेहनतीमुळेच प्रेक्षकांचे इतके प्रेम आम्हाला मिळत आहे.’