"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:36 IST2025-11-10T11:36:12+5:302025-11-10T11:36:46+5:30
शाहरुख खानसोबत काम करण्याचाही सांगितला अनुभव

"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
'हम आपके है कौन' सिनेमामुळे हिंदी सिनेविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे चर्चेत आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने इंडस्ट्रीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. शाहरुख खान, माधुरी दीक्षित यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तिने शेअर केला आहे. तसंच वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा केली आहे. ऐश्वर्या राय बच्चनला बॉडी शेमिंग केलं गेलं यावरुन रेणुका शहाणेने संताप व्यक्त केला आहे.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाली, "तुम्ही इतकं जज कसं करु शकता? तुम्ही माणूस म्हणून कसे आहात हे तुम्ही यातून दाखवत आहात. यापेक्षा तुम्ही ऐश्वर्याने इतकी वर्षी सतत मिळवलेल्या यशाचं कौतुक करु शकत नाही का? पण लोक तिच्या आऊटफिटवरुन, बॉडीवरुन टीका करत आहेत. एखाद्या मोठ्या कंपनीला तुम्हाला काढून टाकण्यात एक मिनिट लागतो. पण ऐश्वर्या अनेक वर्षांपासून कंपनीची ब्रँड अँबेसिडर आहे. जर तुमच्याकडे चांगलं बोलायला काही नसेल तर तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा.
ती पुढे म्हणाली, "अभिनेत्रींवर चांगलं दिसण्यासाठी खूपच दबाव आहे. सोशल मिडिया आल्यावर तर या जगात बरेच बदल झाले आहेत. सगळं अतीच झालं आहे. सतत कोणीतरी आपल्याला जज करतंय हा विचार करत जगणं कलाकारांसाठी विशेषत: अभिनेत्रींसाठी किती कठीण आहे."
शाहरुखसोबत कामाचा अनुभव
रेणुका शहाणे म्हणाली, "शाहरुखचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटतो. तेव्हाही मी त्याच्यासोबत काम करताना तो खूप प्रामाणिक होता. काम सोडून तो बाकी कुठेही लक्ष देत नाही. सेटवर १०० च नाही तर २०० टक्के द्यायचा. प्रत्येक सीन तो अक्षरश: परफेक्ट करायचा. मी त्याच्यात पहिल्या दिवसापासून हा अॅटिट्यूड पाहिला आहे. त्याने फौजी या गाजलेल्या मालिकेत काम केलं होतं आणि मी अगदीच नवीन होते. त्यामुळे तो माझ्या कामाबद्दल थोडा साशंकच होता. नंतर त्याने जेव्हा माझा पहिला सीन पाहिला तेव्हा त्याने मला येऊन चांगलं काम केलंस अशी दाद दिली होती."