राजेश खन्ना यांच्यासोबतचे नाते वैवाहिक नाही; अनिता अडवाणींची याचिका हायकोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 06:02 IST2026-04-02T06:01:45+5:302026-04-02T06:02:03+5:30
दिंडोशी न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने हे अपील फेटाळले.

राजेश खन्ना यांच्यासोबतचे नाते वैवाहिक नाही; अनिता अडवाणींची याचिका हायकोर्टाने फेटाळली
मुंबई : दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतचे आपले नाते 'वैवाहिक' असल्याची मान्यता द्यावी, यासाठी अभिनेत्री अनिता अडवाणी यांनी दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळले. २०१७ मध्ये दिंडोशी दिवाणी न्यायालयाने तांत्रिक कारणांनी अडवाणी यांचा दावा फेटाळला. या निर्णयाला अडवाणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. दिंडोशी न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने हे अपील फेटाळले.
'प्रथम अपील फेटाळण्यात येत आहे,' असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणातील सविस्तर निर्णयाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही.
याचिकेत काय ?
राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या 'आशीर्वाद' या बंगल्यातून बाहेर काढण्यात आले, असा दावा अडवाणी यांनी केला. २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने डिंपल कपाडिया, ट्रिकल खन्ना आणि अक्षय कुमार यांच्याविरोधातील कौटुंबिक हिंसाचाराची कार्यवाही रद्द केली होती. अडवाणी आणि राजेश खन्ना यांचे नाते हे 'विवाहासमान नाते' दिसत नसल्याने घरगुती हिंसाचार कायदा, २००५ अंतर्गत अडवाणी यांची तक्रार पात्र ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.