आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 14:31 IST2025-07-02T14:30:40+5:302025-07-02T14:31:09+5:30

वाईट वाटले पण आश्चर्य नाही,...शरद उपाध्येंची लांबलचक पोस्ट

rashichakrakar sharad upadhye writes letter to dr nilesh sabale regarding chala hawa yeu dya show | आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

'चला हवा येऊ द्या' या गाजलेल्या कार्यक्रमाचं आता दुसरं पर्व येत आहे. पहिल्या पर्वाने १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे सारखे स्टार आपल्याला मिळाले. डॉ निलेश साबळेंनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. तर आता दुसऱ्या पर्वात निलेश साबळेंना डच्चू देत अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करणार आहे. ही बातमी वाचताच 'राशीचक्र'कार  शरद उपाध्ये (Sharad Upadhye) यांनी निलेश साबळेंना खुलं पत्र लिहिलं आहे. फेसबुकवर त्यांनी लांबलचक पोस्ट शेअर करत निलेश साबळेंनी (Dr Nilesh Sabale) हवा येऊ द्याच्या सेटवर त्यांना कशी वागणूक दिली यासंदर्भात लिहिलं आहे.

काही वर्षांपूर्वी 'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडमध्ये शरद उपाध्ये यांनी हजेरी लावली होती. आता निलेश साबळे दुसऱ्या पर्वात सूत्रसंचालक नाहीत हेी बातमी वाचल्यावर त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. ते लिहितात, "आदरणीय नीलेशजी साबळे, आपल्याला 'हवा येऊ द्या'च्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली. वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा.पोहोचलो.पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगितले होते. नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुममध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वाजता. स्माईलही न देता स्टेजवर गेलात. इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वाजता बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते. माझा सारा दिवस फुकट गेला. एडिटींगमध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती. दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट. गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते. एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा, सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल. 

"अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती."

या पत्रातून शरद उपाध्येंनी निलेश साबळेवर निशाणाच साधला आहे. तसंच त्यांना चार गोष्टीची शिकवणही दिली आहे. उपाध्येंच्या या पोस्टवर अनेकांनी ' योग्य प्रकारे कान उपटलेत',  'बरं झालं निलेश साबळेंची ही बाजूही दाखवलीत' अशा कमेंट्स केल्या आहेत.

Web Title: rashichakrakar sharad upadhye writes letter to dr nilesh sabale regarding chala hawa yeu dya show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.