Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 13:06 IST2025-07-15T13:05:42+5:302025-07-15T13:06:10+5:30
Namit Malhotra's Ramayana : निर्मात्यांनी सांगितला 'रामायण' बनवण्यामागचा उद्देश

Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
सध्या सिनेविश्वात एका भव्य सिनेमाची चर्चा आहे. नमित मल्होत्रा (Namit Malhotra) निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana) पुढील वर्षी रिलीज होणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारत आहे. सिनेमाची इतर स्टारकास्टही एकदम तगडी आहे. सिनेमा दोन भागात रिलीज होणार आहे. पहिला भाग २०२६ आणि दुसरा भाग २०२७ साली येणार आहे. हॉलिवूडचे संगीत दिग्दर्शक आणि व्हीएफएक्स मास्टर देखील सिनेमाच्या टीममध्ये आहेत. या भव्य सिनेमाच्या बजेटचीही जोरदार चर्चा होती. आधी ८३५ कोटी तर नंतर १६०० कोटी बजेट असल्याचं बोललं गेलं. मात्र आता खुद्द निर्मात्यांनीच सिनेमाच्या बजेटची घोषणा केली आहे.
'रामायण'चा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. सिनेमात रणबीर आणि यशची फक्त छोटीशी झलक दिसली. हॅन्स झिमर यांचं म्युझिक टीझरचं विशेष आकर्षण होतं. नुकतंच प्रखर गुप्ताला दिलेल्या मुलाखतीत नमित मल्होत्रा म्हणाले, "आम्ही कोणाकडूनही पैसे घेतलेले नाही. ६-७ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही सिनेमा बनवायचं ठरवलं तेव्हा सिनेमाच्या बजेटची जबाबदारी माझ्याकडेच होती. कारण कोणताही भारतीय सिनेमाचं एवढं बजेटच नव्हतं. दोन्ही भाग जेव्हा आमचे बनवून होतील तोपर्यंत सिनेमाचं बजेट ५०० मिलियन डॉलर होईल. जे ४००० कोटी इतकं आहे. आम्ही जगातला सर्वात मोठा सिनेमा बनवत आहोत असं कितीही म्हटलं तरी हॉलिवूडमधील मोठ्या सिनेमांच्या तुलनेत हा स्वस्तात होणारा सिनेमा आहे. म्हणजे आम्ही स्वस्तात इतका मोठा सिनेमा बनवतोय. पण प्रश्न पैशांचा नाही तर या सिनेमाच्या प्रवासाचा आहे. यादरम्यान अनेक अडचणी आल्या. मी अमेरिकेत होतो तिथल्या अडचणी, नंतर कोरोना, लेखकांचा संप या गोष्टी आल्या ज्यावर आपलं नियंत्रण नसतं."
ते पुढे म्हणाले, "रामायण ही आपली संस्कृती आहे ज्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. यासाठी किती खर्च येतो ही दुय्यम गोष्ट आहे. मला फक्त या महाकाव्यावर सिनेमा बनवताना त्याला न्याय द्यायचा आहे. प्रत्येकाला गर्व वाटेल असा हा सिनेमा बनवायचा आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाने 'रामायण'मधील मूल्य आत्मसात करण्याची गरज आहे. आज देश विदेश पातळीवर काय काय घडतंय,युद्धपरिस्थिती पाहता मुलांना फॉरेनमध्ये पाठवण्याचीही भीती वाटत आहे. अशा काळात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी आपली भारतीय संस्कृती खूप काही शिकवून जाते."