'रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका करु नये'
By Admin | Updated: September 14, 2015 11:48 IST2015-09-14T11:48:07+5:302015-09-14T11:48:56+5:30
देशातील कट्टर हिंदूत्ववाद्यांची मुजोरी दिवसेगणिक वाढतच असून आता अभिनेते रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारु नये असा इशाराच तामिळनाडूतील भाजपा नेते एल गणेशन यांनी दिला आहे.

'रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका करु नये'
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १४ - देशातील कट्टर हिंदूत्ववाद्यांची मुजोरी दिवसेगणिक वाढतच असून आता अभिनेते रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारु नये असा इशाराच तामिळनाडूतील भाजपा नेते एल गणेशन यांनी दिला आहे. टिपू सुलतान हा हिंदू व तामिळ विरोधी राजा होता व अशा व्यक्तीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
कन्नड सिनेसृष्टीतील निर्मात्यांनी टिपू सुलतान यांच्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरु केली असून या चित्रपटासाठी तामिळमधील सुपरस्टार रजनीकांत यांना विचारणा करण्यात आली आहे. रजनीकांत यांनी या चित्रपटावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला तरी हिंदूत्ववादी संघटनांनी आत्तापासूनच चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. भाजपाचे तामिळनाडूतील नेते एन. गणेशन यांनी रजनीकांत यांनी हा चित्रपटच स्वीकारु नये असा इशारावजा विनंतीच केली आहे. टिपू सुलतानला हिरो ठरवणारी भूमिका रजनीकांत स्वीकारणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपासोबतच आता अन्य हिंदूत्ववादी संघटनांनीही रजनीकांत यांनी टिपू सुलतानची भूमिका साकारु नये असा इशारा दिला आहे. हिंदूत्ववादी संघटनांच्या या इशा-यानंतर आता तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एखाद्या कलाकाराने कोणती भूमिका साकारावी हेदेखील हिंदूत्ववादी संघटनाच ठरवणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे.