Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
By देवेंद्र जाधव | Updated: July 5, 2025 11:15 IST2025-07-05T11:15:19+5:302025-07-05T11:15:47+5:30
Raj-Uddhav Thackeray Rally : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित आणि अन्य मराठी कलाकार दाखल झाले आहेत. सर्वांनी आपला आनंद व्यक्त केलाय

Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
आज सर्व महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष एका ऐतिहासिक घटनेकडे आहे. २० वर्षांनी राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर येत आहेत. ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आज वरळी येथे पार पडतोय. या विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणूस एकवटला आहे. त्यानिमित्ताने या मेळाव्यात मराठी कलाकार सुद्धा सहभागी झाले आहेत. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव याशिवाय अभिनेत्री चिन्मयी सुमीत, तेजस्विनी पंडित यांनी भावना व्यक्त केलाय.
सिद्धार्थ जाधव म्हणाला, "या दोन्ही नेत्यांना एकत्र बघणं ही गोष्ट आपल्याला खूप उत्सुक करणार आहे. हा अनुभव आणि ती एनर्जी छान आहे तीच अनुभवण्यासाठी आलोय. याच गोष्टीची वाट बघतोय मराठी माणूस. आज फक्त ऐकायचंय साहेबांना!"
तेजस्विनी पंडित म्हणाली, "मराठीसाठीच आलेलो आहोत आम्ही. मराठी भाषेचा जो विजय झालाय जी वज्रमूठ मराठी माणसाने दाखवलीय त्यासाठी आलो आहोत. जी संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे त्यासाठीच आलेलो आहोत. अजून खूप मराठी माणसांनी जोडलं गेलं पाहिजे. अजून मराठी माणसाने एकत्र येणं बाकी. आहे. मराठी मराठीमध्येच खूप गोष्टी विभागल्या गेल्या आहेत."
भरत जाधव म्हणाले, "चुकीची गोष्ट आहे. आपल्याच राज्यात राहून आपण अपमानित होतोय ही चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करतोय. मराठी माणसाने जगायला हवं. मराठीपणा जपायला हवं. असं नाही की हिंदीच्या विरोधात आहे. पण हिंदी सक्तीची नसावी याच विरोधात आपण होतो."
चिन्मयी सुमीत म्हणाली, "एक लबाडी जी झालेली आहे, त्यामुळे हे आंदोलन कशापद्धतीने पुढे न्यायचं आहे याच्यासाठी हे एकत्र येणं आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे हे दोन महत्वाचे नेते त्याच्यासाठी काही करु इच्छितात ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्यांनी जे जाहीर आवाहन केलंय, त्यासाठी आम्ही आलो आहेत. आम्हाला निमंत्रित केलं गेलं नाही. यानिमित्ताने मराठी लोक एकत्र आलेले आहेत, हा सहभाग खूप महत्वाचा आहे." या चौघांनीही ABP माझाशी बोलताना भावना व्यक्त केल्या.