अ‍ॅक्शनपटाचा झणझणीत दणका!

By Admin | Updated: October 3, 2015 01:39 IST2015-10-03T01:39:54+5:302015-10-03T01:39:54+5:30

सिर्फ नामही काफी हैं, असे म्हणण्याएवढी दहशत ‘दगडी चाळ’ या नावात मुळातच आहे. मग त्यावरचा चित्रपट म्हणजे त्याला साजेसा असाच मामला असणार, हा अंदाज अजिबात न चुकवता हा चित्रपट थेट भिडत जातो.

Pumpkin bump of apex! | अ‍ॅक्शनपटाचा झणझणीत दणका!

अ‍ॅक्शनपटाचा झणझणीत दणका!

सिर्फ नामही काफी हैं, असे म्हणण्याएवढी दहशत ‘दगडी चाळ’ या नावात मुळातच आहे. मग त्यावरचा चित्रपट म्हणजे त्याला साजेसा असाच मामला असणार, हा अंदाज अजिबात न चुकवता हा चित्रपट थेट भिडत जातो. अर्थात चित्रपटाच्या शीर्षकाला प्रमाण मानत यात थरार तर आहेच; पण त्याला प्रेमाचा हलका स्पर्शही आहे. मारामारी, गुंडगिरी, थरार असा मसाला पेरत आणि अ‍ॅक्शनचा झणझणीत दणका देत एक रफटफ गोष्ट मांडण्याचा चित्रपटाचा उद्देश सफल झाला आहे.
अपघाताने अनेक गोष्टी घडतात किंवा बिघडतात सुद्धा! माणसाच्या आयुष्याला अनेकदा अपघाताने वेगळेच वळण लागते. कधी ते चांगले ठरते, तर कधी त्यातून आयुष्य उद्ध्वस्त होते. असे अपघात ध्यानीमनी नसताना जीवनाचा एक भाग बनून समोर येतात आणि त्याने कधी कधी माणूस पार बदलून जातो. ‘दगडी चाळ’ या चित्रपटाचा हा अजून एक वेगळा कंगोरा आहे. या चित्रपटाचा काळ १९९६ चा आहे आणि मुंबईतल्या गँगवॉरची पडछाया असलेल्या काळातली ही गोष्ट आहे. एका चाळीत राहणारा सूर्या हा एका पोलीस हवालदाराचा मुलगा आहे आणि तो एका गॅरेजमध्ये काम करतो. चाळीत नव्याने राहायला आलेल्या सोनलशी त्याची नजरभेट होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. एकदा काही गुंड सोनलची छेड काढतात आणि सूर्या$ला त्या गुंडांशी दोनहात करण्याची वेळ येते. डॅडी नामक दगडी चाळीच्या डॉनचे हे गुंड असतात. सूर्याला धडा शिकवण्यासाठी डॅडीचा राइट हॅन्ड मामा मग सूर्याच्या हात धुवून मागे लागतो. या अपघाती प्रसंगाने सूर्याच्या आयुष्याचा ट्रॅक पार बदलून जातो. पुढे सूर्या काही निर्णय घेत जातो आणि या गोष्टीला अजूनच वेगळे वळण मिळते.
चित्रपटाच्या प्रारंभी दगडी चाळीच्या पायाचे बांधकाम केल्यावर मध्येच सूर्या आणि सोनलची लव्हस्टोरी रंगत जाते आणि नंतर गोष्टीचा ट्रॅक पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो. अ‍ॅक्शनबाज चित्रपटाला जे जे आवश्यक आहे ते ते सर्व यात ठासून भरले आहे.
दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी दगडी चाळीचा डॉंन असलेला डॅडी आणि सूर्या या तरुणाची बेमालूम सांगड घालत हा थरार रंगवला आहे. डॅडीचे पात्र ठसवतानाच त्यांनी सूर्या हाच या गोष्टीचा खरा हीरो आहे, याचे भान उत्तम राखले आहे. या दोन्ही व्यक्तिरेखांसाठी त्यांनी कलावंतांची अचूक निवड केलेली आहे आणि इथेच त्यांनी बाजी मारली आहे. सुरेश सावंत व नरेश परदेशी यांच्या कथेवर आदेश अर्जुन व चंद्रकांत कणसे यांनी लिहिलेली पटकथा दमदार असून, पकड घेणारी आहे. अनिकेत खंडागळे यांचे छायांकन उत्तम आहे आणि अमितराजचे संगीत चांगले वाजले आहे.
डॅडीच्या भूमिकेत मकरंद देशपांडेने अतिशय कमी संवादांचा उपयोग करून जे काही उभे केले आहे ते भन्नाट आहे. त्याची नजर आणि त्याचा एकूणच वावर या भूमिकेला अचूक न्याय देणारा आहे. अंकुश चौधरीने यात सूर्या रंगवताना दणदणीत कामगिरी केली आहे. मराठीतला अ‍ॅक्शनपॅक्ड डॅशिंग हीरो म्हणूनही आता अंकुशचे नाव घ्यायला हरकत नाही, एवढ्या आत्मविश्वासाने त्याने हा सूर्या उभा केला आहे. संजय खापरेने यात साकारलेला गुंड मामा तितकाच जोरदार आहे. यात सोनल रंगवणाऱ्या पूजा सावंतच्या वाट्याला आलेल्या मोजक्या प्रसंगांत तिने चांगली छाप पाडली आहे आणि ती यात दिसलीही छान आहे. यतीन कार्येकर यांचा वकील, कमलेश सावंत यांचा इन्स्पेक्टर काळे आणि दिग्विजय रोहिदास यांचा इन्स्पेक्टर खान लक्षात राहतात. अस्सल मराठमोळ्या अ‍ॅक्शनबाज चित्रपटाचा अनुभव देण्यासाठी आता पडद्यावरच्या या ‘दगडी चाळी’ने तिची दारे सताड उघडी केली आहेत.

Web Title: Pumpkin bump of apex!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.