‘शटर’मधील वेश्या ‘चमेली’पासून दूर
By Admin | Updated: July 15, 2015 02:20 IST2015-07-15T02:20:26+5:302015-07-15T02:20:26+5:30
वेश्येची भूमिका दाखविताना ती खूप लाउड होते. पान खाणारी, टपोरी बोलणारी ‘चमेली’टाइप वेश्या साकारणे खरंतर सोपं; पण ‘शटर’मधील वेश्येच्या मागे वेगळे कंगोरे आहेत.

‘शटर’मधील वेश्या ‘चमेली’पासून दूर
वेश्येची भूमिका दाखविताना ती खूप लाउड होते. पान खाणारी, टपोरी बोलणारी ‘चमेली’टाइप वेश्या साकारणे खरंतर सोपं; पण ‘शटर’मधील वेश्येच्या मागे वेगळे कंगोरे आहेत. चित्रपटाच्या शेवटी तिचे वेगळेपण समोर येते. त्यामुळे ही भूमिका साकारताना अगदी शुद्ध भाषेतील संवाद म्हटले. त्यामुळेच ती लोकांना अधिक भावली, असे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सांगितले. सोनालीची भूमिका असलेला ‘शटर’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट सध्या महाराष्ट्रभर चांगलाच गाजतोय. मल्याळम् भाषेतील चित्रपटाचा हा पहिलाच मराठी रिमेक आहे. चित्रपटाच्या निमित्ताने सोनालीसह चित्रपटाचे निर्माते प्रकाश बारे, सह निर्माते दीपक शर्मा, बालकलाकार कौमुदी वाळोकर यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी सोनालीने दिलखुलास गप्पा मारल्या. ‘शटर’ या चित्रपटाची कथा थ्रिलर सस्पेन्स अशी आहे. यातील भूमिकेविषयी सोनाली सांगते, चित्रपटातील वेश्येची भूमिका खूपच आव्हानात्मक होती. या चित्रपटात एक सुशिक्षित आणि चांगल्या घरातील वेश्या दाखवायची होती. त्यामुळे मुद्दाम नाटकीपणा आणला नाही. एका आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिकेची भूक लागली होती. या भूमिकेमुळे ती इच्छा पूर्ण झाली. मराठीतही खूप चांगले चित्रपट येत असल्याचे प्रकाश बारे यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत हा बदल वेगाने होत असून, तो स्वागतार्ह आहे. मात्र, चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या दुजाभावाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘मी मराठीतच खूप एन्जॉय करतेय. इथेच काम करायला खूप आवडते,’ असे सोनाली आवर्जून सांगते; पण हिंदीत आव्हानात्मकभूमिका मिळाली, तर ती स्वीकारण्याची तयारी आहे़ ‘हिंदीत तोच साचेबद्धपणा असतो. तसेच, बॉलिवूडमध्ये आउटसाइडर्सला अजिबात स्कोप मिळत नाही. त्यांच्या तोडीच्या भूमिका नसतात. सध्या तरी माझ्या अभिनयक्षमतेला मराठीतच खूप चांगला वाव मिळतोय,’ असेही ती म्हणाली.
आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक येतात. त्यामध्ये आपले मित्र-शत्रू कोण, हे कळत नाही; पण अशा काही घटना घडतात, ज्याद्वारे आपल्यासमोर खरे चित्र उलगडते. ‘शटर’मध्येही विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून लोकांच्या मनाचे ‘शटर’ उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- प्रकाश बारे
‘शटर’मधील भूमिका
खूप शिकवून गेली.
सचिन खेडेकर यांच्यामुळे ही भूमिका मिळाली.
मुलगी व वडिलांमधील जनरेशन गॅपमुळे त्यांच्यातील नात्यांचे विविध पैलू उलगडण्यात आले आहेत. सर्वच जण अनुभवाने खूप मोठे असल्याने, खूप शिकायला मिळाले.
- कौमुदी वाळेकर
चित्रपटाच्या लोकेशनसाठी २ ते ३ महिने फिरत होतो. खूप ठिकाणे पाहिली. कथा जिवंत वाटायला हवी, यादृष्टीने प्रयत्न होता. पण शेवटी संपूर्ण सेट उभारून केवळ १३ दिवसांत शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे. हे एक आव्हानच होते.
- दीपक शर्मा