वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 10:00 IST2025-05-12T09:59:27+5:302025-05-12T10:00:05+5:30
प्रतीक बब्बरने लग्नाच्या तीन महिन्यांनंतर लग्नाच्या वेळेस वडील आणि त्यांच्या कुटुंबाला का बोलावलं नाही, याविषयी खुलासा केला. प्रतीकने खरं कारण अखेर सांगितलं

वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (smita patil) यांचा मुलगा प्रतीक बब्बरने काही दिवसांपूर्वी लग्न केलं. प्रतीकने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत लग्न केलं. प्रतीकच्या (pratik babbar) लग्नात त्याचे वडील राज बब्बर (raj babbar) आणि त्याची भावंडं अनुपस्थित होती. प्रतीकने त्याचे वडील आणि भावंडांना लग्नाचं आमंत्रण दिलं नसल्याने खूप चर्चा झाली. अखेर लग्नाच्या काही दिवसांनंतर प्रतीकने कुटुंबाला त्याच्या लग्नात का बोलावलं नाही, याचा स्वतःच खुलासा केला.
प्रतीकने कुटुंबाला लग्नात का बोलावलं नाही?
प्रतीक बब्बरने झूमला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला. वडील राज बब्बर आणि भावंडांना लग्नाला न बोलावण्यामागे कोणतेही वैयक्तिक मतभेद किंवा भांडणं नव्हती, हेही प्रतीकने स्पष्ट केलं. प्रतीकने आई स्मिता पाटील यांच्या घरी लग्न केलं. प्रतीकची आई (स्मिता पाटील) आणि सावत्र आई नादिरा बब्बर यांच्यात पूर्वी अनेक गोष्टी घडल्या होत्या. त्यामुळे स्मिता पाटील यांच्या घरी वडील आणि त्यांच्या कुटुंबाला लग्नासाठी बोलावणं प्रतीकला योग्य वाटलं नाही.
प्रतीकने याविषयी खुलासा केला की, "माझी आई आणि माझ्या वडिलांची पत्नी यांच्यात खूप समस्या होत्या. त्यावेळी बातम्यांमध्येही अनेक गोष्टी आल्या होत्या. वडील आणि त्यांच्या कुटुंबासोबत मला एक वेगळा कौटुंबीक सोहळा करायचा होता. माझ्या आईचे वडिलांच्या कुटुंबासोबतचे संबंध तुटल्यावर आईच्या घरी त्यांना बोलावणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मला जे बरोबर वाटलं ते त्यावेळी मी केलं."
"मी त्यांचा द्वेष करतो असं नाही. माझी आई आणि तिच्या इच्छांचा सन्मान करणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. माझे वडील आणि त्यांची पत्नी नादिरा बब्बर लग्नाच्या वेळी तिथे नव्हते, ते घरी येऊ शकले नाहीत याचं मला वाईट वाटलं. हे घर माझ्या आईने खरेदी केलं होतं. सिंगल मदर म्हणून तिला या घरात मला मोठं करायचं होतं. मी माफी मागतो, पण हा निर्णय मी आणि माझ्या पत्नीने मिळून घेतला होता."