प्रशांत दामले पुन्हा १७ वर्षांनंतर गाणार
By Admin | Updated: November 7, 2015 00:34 IST2015-11-07T00:34:33+5:302015-11-07T00:34:33+5:30
प्रशांत दामले म्हणजे चतुरस्र कलाकार. ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ च्या निमित्ताने आता ते गायकही झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल १७ वर्षांनंतर प्रशांतचे गाणे चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे.

प्रशांत दामले पुन्हा १७ वर्षांनंतर गाणार
प्रशांत दामले म्हणजे चतुरस्र कलाकार. ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ च्या निमित्ताने आता ते गायकही झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल १७ वर्षांनंतर प्रशांतचे गाणे चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई 2 - लग्नाला यायचंच’ चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशीच्या वडिलांची भूमिका प्रशांतने साकारली असून, पक्के पुणेकर असलेले हे वडील या चित्रपटात ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं... काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं!’ हे गाणे गात आहेत.
श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेले आणि अशोक पत्की यांनी संगीत दिलेले हे गाणे ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटकातील. आजही ते रसिकांच्या ओठावर गुणगुणत असते. हे सुपरहिट आणि अजरामर झालेले गाणे ‘मुंबई पुणे मुंबई-2’ चित्रपटामध्ये घेण्याच्या परवानगीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तत्काळ होकार दिला असे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सांगितले.
प्रशांत दामले यांनी आपल्या ३३ वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये गेला माधव कुणीकडे, लेकरे उदंड झाली, प्रियतमा, एका लग्नाची गोष्ट, आम्ही दोघे राजा राणी, ओळख ना पाळख आणि बहुरूपी अशी नाटके केली आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई 2 - लग्नाला यायचंच’ १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. लेखन आणि दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले आहे. स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. त्याशिवाय प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, आसावरी जोशी, श्रुती मराठे आणि सुहास जोशी हे आघाडीचे कलाकार महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारत आहेत. पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहेत.