'मटका किंग' ते 'तस्करी'; नवीन वर्षात हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार 'हे' मराठी कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:40 IST2026-01-05T15:52:10+5:302026-01-05T16:40:47+5:30

सध्या सगळीकडे ओटीटीचा बोलबाला आहे. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळा कंटेंट पाहायला मिळत आहे. विशेषत: हिंदी वेबसीरिजमध्ये अनेक मराठी कलाकार दिसत आहेत. या नवीन वर्षातही अशा काही वेबसीरिजची चर्चा आहे ज्यात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे.

सध्या हॉटस्टारवर 'मिसेस देशपांडे' सीरिज नंबर वनवर आहे. नागेश कुकनूर दिग्दर्शित या सीरिजमध्ये माधुरी दीक्षितने सीरियल किलरची भूमिका साकारली आहे. तर मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून लक्ष वेधून घेतलं आहे.

तर यावर्षी नागराज मंजुळेंची बहुप्रतिक्षित 'मटका किंग' सीरिज येणार आहे. विजय वर्मा, कृतिका कामरा आणि मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची यामध्ये भूमिका आहे. तसंच सिद्धार्थ जाधवही दिसणार आहे. ही सीरिज जुगार,सट्टा, त्यातील धोके याभोवती फिरणाऱ्या कथेवर आधारित आहे.

याशिवाय इमरान हाश्मीची 'तस्करी: द स्मगलर्स वेब' सीरिज येणार आहे. यामध्ये अमृता खानविलकर, अनुजा साठे आणि अक्षया नाईक या तीन मराठी अभिनेत्रींची वर्णी लागली आहे.

हलक्या फुलक्या सीरिजमधील एक म्हणजे 'गुल्लक'. या सीरिजच्या पाचव्या सीझनची घोषणा झाली आहे. मराठी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी याही सीझनमधून सर्वांना हसवणार आणि रडवणारही आहे.

सध्या ट्रेडिंगमध्ये असलेल्या गिरीजा ओकची 'परफेक्ट फॅमिली' वेबसीरिज नुकतीच ओटीटीवर आली. गिरीजा गुलशन देवय्यासोबत झळकली. यावर्षी या सीरिजचा सीझन २ येईल असा अंदाज आहे.

शिवाय भाग्यश्री लिमये, सिद्धार्थ चांदेकर, प्रिया बापट, श्रिया पिळगावकर, जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे हे कलाकार देखील यावर्षी पुन्हा वेगवेगळ्या हिंदी सीरिजमध्ये दिसणार आहेत.