'वडिलांचं निधन, डिप्रेशन अन् आत्महत्येचे विचार', आयुष्यातील वाईट काळाबाबत कपिलने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 11:00 AM2023-03-12T11:00:05+5:302023-03-12T11:14:44+5:30

सर्वांना खळखळून हसवणाऱ्या कपिलने कधीकाळी आत्महत्येचाही विचार केला होता.

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) म्हणजे सर्वांना हसवणारा कपिलच डोळ्यासमोर येतो. कॉमेडी नाईट्स विद कपिल शर्मा या शोने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले. अनेक सेलिब्रिटी त्याच्या शो मध्ये येण्यासाठी उत्सुक असतात.

सर्वांना खळखळून हसवणारा कपिल खऱ्या आयुष्यात मात्र किती दु:खांना सामोरा गेला आहे याची कल्पनाही करता येणार नाही. एक काळ असा होता की कपिल डिप्रेशनमध्ये गेला होता. याचविषयी त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

कपिल म्हणाला, 'एक सेलिब्रिटी म्हणून अनेक लोक तुम्हाला ओळखतात. तुम्ही त्यांचे मनोरंजन करत असतात. पण हेच तुम्ही घरी एकटेच असता. तुम्ही सामान्यांसारखे समुद्रकिनारी बसू शकत नाही, कुठे एकटेच थांबू शकत नाही. तुम्ही २ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहता. जेव्हा संध्याकाळी बाहेर अंधार व्हायला लागतो तेव्हा डिप्रेशन येते.'

'ना सुख ना दु:ख काहीत टिकत नसतं. एक वेळ अशी आली जेव्हा मी आत्महत्येचा विचार केला. मला वाटलं माझ्याजवळ असं कोणीच नाही ज्याच्याशी मी काही बोलू शकेल, मनातलं सांगू शकेल. मी जिथून येतो तिथे मानसिक आरोग्यावर चर्चा होत नाही. हे काही पहिल्यांदा घडत नव्हतं. लहानपणीही असं मला वाटलं असेल पण कोणीच याकडे लक्ष दिलं नसेल.'

कपिलच्या आयुष्यात अशीही वेळ आली जेव्हा त्याने वडिलांना रुग्णालयात कॅन्सरशी झुंज देताना पाहिले. कपिल त्याच्या वडिलांच्या फारच जवळ होता. वडिलांच्या शेवटच्या काही दिवसात त्यांना वेदनेने विव्हळत असताना पाहून कपिल तुटला होता.तेव्हा कपिल केवळ २० वर्षांचा होता.

दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात त्याच्या वडिलांना आयसीयूत ठेवले. मात्र ते आयसीयूमधून जीवंत बाहेर आलेच नाहीत. ते ५-६ दिवस खूपच भयंकर होते असंही कपिल म्हणाला. इतके की कपिलने देवाकडे प्रार्थना केली की एकतर वडिलांना घेऊन जा किंवा हा त्रास तरी देऊ नको.

कपिलचं यश बघायला त्याचे वडील नव्हते.ते आज असते तर मुलाचं यश बघून खूप खूश झाले असते. जेव्हा त्याला शाळा कॉलेजमध्ये छोटी छोटी ट्रॉफी जरी मिळाली तरी ते खूश व्हायचे. आज मुलाचा शो नॅशनल टेलिव्हिजनवर येतो हे जर त्यांनी बघितलं असतं तर त्यांना खूप आनंद झाला असता.

कपिलची आई नेहमी कपिलच्या शो मध्ये उपस्थित असते. आपल्या मुलाचं यश बघून तिचे डोळे पाणावतात. तिला कपिलचा खूप अभिमान वाटतो.

कपिल शर्माचा झ्विगॅटो हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या मध्ये त्याने सामान्य डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. कपिलने करिअरच्या सुरुवातीला केलेले सिनेमे फ्लॉप झाले होते. मात्र आता झ्विगॅटो सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

कपिलने 2018 मध्ये गिन्नी चतरथ सह लग्न केले. 2019 मध्ये त्यांना अनायरा ही मुलगी झाली तर २०२१ मध्ये त्यांना त्रिशान हा मुलगा झाला.