Bigg Boss fame Shiv Thakare: : “तरच मी तो काढेन...” वीणाच्या नावाच्या टॅटूबद्दल शिव ठाकरेनं स्पष्टच सांगितलं...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 04:57 PM2023-02-23T16:57:06+5:302023-02-23T17:06:02+5:30

Bigg Boss fame Shiv Thakare: वीणाने आपल्या हातावरचा शिवच्या नावाचा टॅटू हटवला आहे. पण शिवच्या हातावर अजूनही वीणाच्या नावाचा टॅटू आहे.

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये शिव ठाकरे ( Shiv Thakare ) आणि वीणा जगताप (Veena Jagatap ) यांचं प्रेम बहरलं होतं. इतकं की, शिवनं वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. वीणानेही शिवच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता.

बिग बॉस मराठी संपल्यावर हे लव्ह बर्ड्स घराबाहेर आलेत आणि काहीच महिन्यांत काहीतरी बिनसलं. नेमकं काय बिनसलं हे कळायला मार्ग नाही. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी चर्चेत आली.

वीणानं शिवसोबतचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले अगदी त्याच्या नावाचा टॅटूही पुसला. अर्थात खरं प्रेम इतक्या सहज संपत नाही, असं म्हणतात. कदाचित हेच खरं असावं.

शिवला ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) घरात ढसाढसा रडताना पाहून वीणानेच त्याला धीर दिला होता. प्लीज रडू नकोस, मी नेहमी तुझ्यासोबत आहे, असं ती म्हणाली होती. आता ‘बिग बॉस 16’ संपल्यानंतर शिव वीणाबद्दल बोलताना दिसला.

शिव ठाकरे त्याच्या हातावरील टॅटूबद्दल बोलला. टॅटू अर्थातच वीणाच्या नावाचा. वीणाने आपल्या हातावरचा शिवच्या नावाचा टॅटू हटवला आहे. पण शिवच्या हातावर अजूनही वीणाच्या नावाचा टॅटू आहे.

एका मुलाखतीत शिवला याच टॅटूबद्दल प्रश्न विचारण्यात आला. हा टॅटू काढून टाकावा असं का वाटलं नाही?असा प्रश्न त्याला मुलाखतीत विचारला गेला.

त्यावर तो म्हणाला, “मी जे केलं ते मला ठाऊक आहे. ती एक व्यक्ती योग्य होती. आता आम्ही वेगळे झालो असलो तरी त्यावेळी ज्या काही गोष्टी घडल्या त्या योग्य होत्या. त्यामुळे मला हा टॅटू लपवण्याची किंवा काढून टाकण्याची काही गरज नाही.”

“ माझ्या आयुष्यात जेव्हा कुणी येईल, तेव्हा तिला माझा हा टॅटू खटकलाच किंवा वाईट वाटलंच तर मी तो काढेल. पण सध्या तरी त्याची काहीच अडचण नाही. मला तो अजिबात खुपत नाही आणि मला त्या व्यक्तीप्रती आदर आहे. मग मी तो का लपवू?”, असं तो म्हणाला.

“बिग बॉस 16 मध्ये मला प्रेमाचा ड्रामा करायचा असता तर कदाचित मी हा टॅटू घरात जाण्याआधीच पुसून टाकण्याचा विचार केला असता. पण तसं काही नव्हतंच. मी माझ्या सगळ्या गर्लफ्रेंडबद्दल बोलतो. मग हा टॅटू लपवायची काय गरज?” असं शिव ठाकरे म्हणाला.

“मी स्वत:ला एक वचन दिलं आहे. यापुढे कुठल्याही रिअ‍ॅलिटी शोमध्ये मी कधीही प्रेमात पडणार नाही, असं वचन मी स्वत:ला दिलं आहे. बीबी मराठीमध्ये आम्ही एकमेकांसाठी रोमँटिक गोष्टी केल्या. ब्रेकअप झालं पण अजूनही आम्ही एकमेकांना विसरू शकत नाही,” असं शिव ‘बिग बॉस 16’मध्ये असताना म्हणाला होता.