ख्रिश्चन धर्म सोडून स्वीकारला हिंदू धर्म, २०० कोटींची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:31 IST2025-06-30T17:25:48+5:302025-06-30T17:31:23+5:30

तिचे चित्रपट तिच्या नावाने ओळखले जातात, परंतु तिचे वैयक्तिक जीवन देखील चर्चेत राहिले आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्येअनेक अभिनेते, अभिनेत्रींनी आपला धर्म बदलल्याचं पाहिलं आहे. एक-दोन नव्हे, अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जिनं ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता.

कित्येक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा (Nayanthara). नयनतारा हिला लेडी सुपरस्टार म्हणूनही ओळखलं जातं. नयनतारानं ऐन यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर आपला धर्म बदलण्याचा निर्णय घेतला होता.

नयनताराचं खरं नाव डायना मरियम कुरियन आहे. १९८४ साली बंगळुरुमध्ये जन्माला आलेली नयनतारा वयाच्या २७ व्या वर्षी हिंदू बनली होती. २०११ साली तिने हिंदू धर्म स्वीकारला. अभिनेत्रीनं आपल्या प्रेमापोटी धर्म बदलल्याचं बोललं जातं.

एकेकाळी नयनतारा ही सुपरस्टार अभिनेत्री प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. प्रभूदेवा तेव्हा विवाहित होता आणि त्याला मुलंही होती. तरीही दोघे लिव्ह इन मध्ये राहत होते.

तेव्हा प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने धर्म बदलल्याची चर्चा होती. प्रभुदेवा पत्नीला घटस्फोट देऊन नयनताराशी लग्न करणार होता. पण, अचानक त्यांचे मार्ग वेगळे झाले.

त्यानंतर वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रचंड उलथापालथ झाल्यानं २०११-१२ मध्ये अभिनेत्रीने ब्रेक घेतला. पुढे जुनं सर्व विसरुन नयनतारा पुन्हा एकदा सुरुवात केली होती. आज नयनताराचा समावेश देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत झालेला आहे.

नयनतारानं शिक्षण घेतल्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. नंतर काही कास्टिंग डायरेक्टर्सने तिला सिनेमांची ऑफर दिली. आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तिनं 'मनासिनक्करे' या मल्याळम चित्रपटातून केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता.

नयनतारा अतिशय आलिशान जीवन जगते. तिची एकूण संपत्ती २०० कोटी रुपये आहे. अभिनेत्रीकडे ५० कोटी रुपयांचं प्रायव्हेट जेट असल्याचंही सांगण्यात येत आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वात नयनतारा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. प्रत्येक सिनेमासाठी ती ५ ते १० कोटी रुपये फी आकारते.

नयनताराने बॉलिवूडमध्ये केवळ एकच चित्रपट केला आहे. २०२३ मध्ये अभिनेता शाहरुख खानसोबत 'जवान'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या करिअरमधील हा एक मोठा टप्पा होता

नयनताराचा विवाह विघ्नेश सिवनशी झाला आहे. नयनतारा आणि विग्नेश २०१५ साली 'नानुम राउडी' या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. ६ वर्षांच्या डेटिंगनंतर नयनतारा आणि विग्नेशने लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०२२मध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यानंतर सरोगसी पद्धतीने त्यांना जुळी मुले झाली आहेत.