बॉलिवूडच्या 'व्हिलन'चं खोपोलीत १०० एकरचं फार्महाऊस! हेलिपॅडपासून घोडे-शहामृग ते ट्री हाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 18:12 IST2026-02-26T18:02:42+5:302026-02-26T18:12:58+5:30
अभिनेता सध्या त्याच्या आलिशान लाइफस्टाइलमुळं चर्चेत आहे. मुंबईजवळील खोपोली इथं त्याचं तब्बल १०० एकरात पसरलेले भव्य फार्महाऊस पाहून चाहते थक्क झालेत. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडच्या पडद्यावर एकेकाळी आपल्या नकारात्मक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवणारा अभिनेता रजत बेदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रजत बेदी गेले अनेक वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर होता. पण, त्याच्या करिअरला किंग खानचा लेक आर्यनच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसीरिजमुळं पुन्हा नवसंजीवनी मिळाली. अशातच रजत त्याच्या १०० एकरातल्या पसरलेल्या फॉर्महाऊसमुळं चर्चेच्या क्रेंदस्थानी आला आहे.

मुंबईजवळील खोपोली येथे रजतचे तब्बल १०० एकरात पसरलेले एक अवाढव्य फार्महाऊस आहे. नुकतीच त्याने पिंकव्हिलाशी बोलताना या फार्महाऊसची सफर चाहत्यांना घडवून आणली असून, तेथील सोयीसुविधा पाहून सर्वांचे डोळे दिपले आहेत.

रजत बेदीच्या या फार्महाऊसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेले हेलिपॅड. रजतनं सांगितलं की, रस्तेमार्गाने येण्याऐवजी तो आणि त्याचे कुटुंब बहुतांश वेळा थेट हेलिकॉप्टरनेच या फार्महाऊसवर येतात.

निसर्गाची आवड असलेल्या रजतच्या फार्महाऊसमध्ये केवळ घोडेच नाहीत, तर चक्क शहामृगही पाळण्यात आले आहेत. हे शहामृग त्याने खास चेन्नईहून इथे आणले आहेत. तसेच फार्महाऊसवर ससे आणि विविध प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी आहेत.

'कोई मिल गया' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतरही रजतला हवं तसं काम मिळालं नाही. आर्थिक आणि मानसिक अडचणींमुळे तो काही काळ कॅनडाला स्थायिक झाला होता.

बॉलिवूड सोडल्यानंतर रजत २० वर्षे कॅनडामध्ये होता. तिथे त्याने रिअल इस्टेट आणि इतर व्यवसायांतून करोडो रुपयांची मालमत्ता कमावली. आता पुन्हा एकदा तो अभिनयात सक्रिय झाला असून, या कमबॅकपेक्षा त्याच्या 'लार्जर दॅन लाईफ' लाइफस्टाइलचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

"बॉलिवूडमध्ये जो दिसतो तोच विकला जातो, पण मला इंडस्ट्रीबद्दल कोणतीही तक्रार नाही", असे त्याने यावेळी नमूद केले.

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये भूमिका कशी मिळाली, याबद्दल सांगताना तो म्हणाला, "आर्यनचा मला फोन आला आणि तो म्हणाला की, ही भूमिका खास तुमच्यासाठीच लिहिली आहे. वेबसीरिज प्रदर्शित झाल्यावर त्याचे शब्द खरे ठरले आणि लोक मला पुन्हा ओळखू लागले" अशा शब्दांत रजतने आर्यन खानप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

रजत बेदी आता केवळ स्वतःच नाही, तर आपल्या मुलांना बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याचा मुलगा लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून, त्याची मुलगी देखील बॉलिवूडमध्ये येण्याचा विचार करत आहे. आपल्या मुलांनी चित्रपटसृष्टीत यशस्वी व्हावे, अशी इच्छा रजतने व्यक्त केली आहे.

















