कोणी जंगलात तर कोणी समुद्रकिनारी! बॉलिवूड स्टार्सनी आपल्या जोडीदाराला कसं केलं होतं प्रपोज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 18:53 IST2026-02-08T18:49:07+5:302026-02-08T18:53:36+5:30
आज प्रपोज डेच्या निमित्तानं बॉलिवूड स्टार्सनी आपल्या जोडीदाराला कसं प्रपोज केलं होतं, याबद्दल जाणून घेऊया.

Propose Day Bollywood Stars: अवघ्या काही दिवसांवर 'व्हॅलेंटाईन डे' येऊन ठेपला आहे. आज प्रपोज डेच्या निमित्तानं बॉलिवूड स्टार्सनी आपल्या जोडीदाराला कसं प्रपोज केलं होतं, याबद्दल जाणून घेऊया.

रणबीर कपूरने जंगल सफारीदरम्यान मसाई मारामध्ये (केनिया) आलिया भटला प्रपोज केला होता. गुडघ्यावर बसून अभिनेत्याने आलियाला अंगठी घातली आणि तिला लग्नासाठी प्रपोज केला होता. रणबीरने या खास क्षणाचे फोटो टिपण्यासाठी गुपचूप एका फोटोग्राफरचीही व्यवस्था केली होती.

रितेश आणि जिनिलियाने १० वर्ष डेट करूनही एकमेकांना अधिकृतपणे प्रपोज केलं नव्हतं. अखेर लग्नाला ३ दिवस बाकी राहिले असताना रितेशने जिनिलियासाठी ड्रीम प्रपोजल प्लॅन केलं होतं. त्याने जिनिलियाला गेटवे ऑफ इंडियावरून एका 'यॉट'वर नेलं, तिचा आवडता पिझ्झा ऑर्डर केला. बोट मरीन ड्राइव्हजवळ आल्यावर रितेशने ठरवल्याप्रमाणे जवळपास राहणाऱ्या एका मित्राला 'ओके' असा मेसेज केला. त्यानंतर त्या मित्राच्या घराच्या टेरेसवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि मग रितेशनं जिनिलियाला माझ्याशी लग्न करशील का? असं विचारलं.

अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला न्यू यॉर्कमधील 'गुरु' चित्रपटाच्या प्रीमियरनंतर प्रपोज केलं होतं. न्यूयॉर्कमध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तो आपल्या हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून विचार करायचा की ऐश्वर्याशी लग्न केले तर किती बरे होईल. त्यानंतर काही दिवसांनी अभिषेक ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत घेऊन गेला आणि तिला लग्नासाठी प्रपोज केले. ऐश्वर्याने लगेच संमती दिली होती.

देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांची लव्हस्टोरीही खूप फिल्मी आहे. अवघ्या काही भेटीतच एकमेकांचं एकमेकांवर प्रेम जडलं. ग्रीसमध्ये नीकने गुडघ्यावर बसून प्रियंकाला प्रपोज केले होते.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रणवीरने दीपिकाला समुद्रकिनारी लग्नासाठी प्रपोज केला होता. तेव्हा दीपिका आश्चर्याने भारावून गेली होती.

सैफ अली खान याच्यापेक्षा करिना जवळपास १० वर्षांनी लहान आहे. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. फार कमी लोकांना माहीत आहे की करिना या नात्यासाठी सहज तयार झाली नव्हती. २००८ मध्ये टशन सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दोघांचं सूत जुळलं. पण सैफला नात्याासाठी हो म्हणण्यापूर्वी करिनाने त्याला दोनदा नकार दिला होता.

एका चॅट शोमध्ये करिनाने याबद्दल सांगितलं होतं. 'खरं तर, सैफने पॅरिसमध्ये दोन वेळा मला प्रपोज केलं होतं. पहिल्यांदा त्याने एका बारमध्ये प्रपोज केलं होतं. मला वाटतं आपण लग्न केलं पाहिजे असं सैफ त्यावेळी बोलला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा नोट्रे-डॅम चर्चमध्ये प्रपोज केलं होतं. करीनाने सुरुवातीला थोडा वेळ घेतला, पण नंतर 'हो' म्हटलं. विशेष म्हणजे या शहरात सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान यांनी त्याची आई शर्मिला टागोर यांना प्रपोज केलं होतं.

शाहरुख १९ वर्षांचा होता तर गौरी १४ वर्षांची होती, तेव्हा ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. रोमान्सचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानने गौरीला मुंबईत समुद्र किनाऱ्यावर लग्नासाठी प्रपोज केलं होतं. मात्र, तरीही गौरीने त्याला नकार दिला. एका मुलाखतीत शाहरुख खानने सांगितले होते की, जेव्हा त्याच्या आईचे निधन झाले तेव्हा गौरीलाही खूप वाईट वाटले आणि त्यानंतर तिने त्याच्याशी लग्न करण्यास होकार दिला.

तर बॉलिवूडमध्ये अशीदेखील एक जोडी आहे, ज्यांनी कधीच एकमेंकाना प्रपोजचं केलं नाही. विराट कोहलीने अनुष्का शर्माला प्रपोज केलं असेल असं अनेकांना वाटत असेल. पण तसं नाही. विराट कोहलीनं एका मुलाखतीत सांगितले की, मी अनुष्काला कधीच प्रपोज केलं नव्हतं. सगळं नैसर्गिकरित्या घडलं. अनुष्काला गो विथ द फ्लो जाऊन नातं टिकवायचं होतं. आम्हा दोघांनाही वाटलं की आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत. सगळं काही इतक्या सुरळीत चाललंय हे पाहून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

















