Ankita Konwar : सासूबाईंपेक्षाही १ वर्षाने मोठा आहे मिलिंद सोमण; लग्नावेळी नातेवाईकांनी पालकांना मारलेले टोमणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:34 IST2026-03-09T13:23:14+5:302026-03-09T13:34:56+5:30

Milind Soman And Ankita Konwar : मिलिंद आणि अंकिताने कुटुंबाच्या पाठिंब्याने लव्ह मॅरेज केलं, पण सुरुवातीला त्यांच्या नात्यावर टीका करण्यात आली.

सुपर मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने २०१८ मध्ये स्वतःपेक्षा २६ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरशी लग्न केलं आहे. या दोघांमधील वयाच्या अंतराने सर्वांनाच चकित केलं होतं.

मिलिंद आणि अंकिताने कुटुंबाच्या पाठिंब्याने लव्ह मॅरेज केलं, पण सुरुवातीला त्यांच्या नात्यावर टीका करण्यात आली. अंकिताने सांगितलं की, मिलिंद तिच्या आईपेक्षाही वयाने एक वर्षाने मोठा आहे, तरीही त्यांचं नातं अत्यंत घट्ट आहे.

आपल्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना अंकिता म्हणाली, "आम्ही ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. आमची भेट होणं हे नशिबातच होतं. सुरुवातीला माझ्या आईला त्रास झाला, पण नंतर सर्व काही ठीक झालं."

मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाला आता ८ वर्षे पूर्ण झाली आहेत.'फाइंड योर अल्ट्रा'शी संवाद साधताना अंकिता म्हणाली, "आम्ही एका नाईट क्लबमध्ये भेटलो होतो. म्हणूनच माझा नशिबावर विश्वास आहे."

"आम्ही दोघेही नाईट क्लबमध्ये जात नाही. पण त्या दिवशी कसे गेलो, माहित नाही. मिलिंद आणि मी एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. मी त्यांना तिथे आधीही एक-दोनदा पाहिलं होतं, पण कधी बोलले नव्हते. मी त्यांची फॅन आहे, पण कोणत्याही स्टारला सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्रास देणं मला आवडत नाही."

अंकिताने सांगितलं की, ती तिच्या मित्रांसोबत फक्त १५ मिनिटांसाठी पबमध्ये गेली होती. सोबत फोन किंवा इतर काहीही नव्हतं. अंकिता म्हणाली, "माझ्या मित्रांनी मला तिथे पुश केलं, तेव्हा मी मिलिंदला 'हाय' म्हटलं आणि अचानक विचारलं की, तुला डान्स करायला आवडेल का?"

"हे खूपच अनपेक्षित होतं कारण तो सहसा डान्स करत नाही, पण त्या दिवशी त्याने केला. त्यानंतर माझ्याबद्दल, माझ्या पालकांबद्दल आणि बहिणीबद्दल विचारपूस केली. थोड्या वेळाने माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की मिलिंद तुला शोधत आहे. जेव्हा मी त्यांना 'बाय' करायला गेले, तेव्हा त्याने फोननंबर दिला."

अंकिताने पुढे सांगितलं की, सुरुवातीला तिच्या कुटुंबाला मिलिंद यांच्याबद्दल आक्षेप होता. अंकिता म्हणाली, "आम्हाला पाहून कोणालाही वाटणार नाही की आमच्यात वयात इतकं अंतर आहे."

"आमची कम्पॅटिबिलिटी तशीच आहे. जेव्हा मी माझ्या पालकांना सांगितलं, तेव्हा ते इतर गोष्टींबाबत थोडे घाबरले होते. वयातील अंतराचा माझ्या आईवर जास्त परिणाम झाला होता, ती संकोचत होती. कारण मिलिंद माझ्या आईपेक्षाही एक वर्षाने मोठा आहे."

"सुदैवाने माझ्या वडिलांना कोणताही संकोच नव्हता. त्यांनी सर्व काही सांभाळून घेतलं. मी माझ्या आईलाही सांगितलं की घाबरण्याची गरज नाही, जर तुला हे आवडत नसेल तर काही हरकत नाही."

नातेवाईक कशा प्रकारे तिच्या पालकांना टोमणे मारायचे, हेही अंकिताने सांगितलं. अंकिता म्हणाली, "नातेवाईक आई-वडिलांकडे जाऊन म्हणायचे की हे नातं चुकीचं आहे, मिलिंद वयाने खूप मोठा आहे. पण माझे पालक खूप सपोर्टिव्ह आहेत. ते उत्तर द्यायचे की- काही हरकत नाही, जर ती यात आनंदी असेल, तर आम्ही तिच्या पाठीशी आहोत."