रवींद्र महाजनी एकटे का राहायचे? कुणालाच कसं कळलं नसेल?; नेटिझन्समध्ये एकच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:03 AM2023-07-15T11:03:59+5:302023-07-15T11:16:42+5:30

Ravindra Mahajani : मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे रवींद्र महाजनी १४ जुलै रोजी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात ते मृतावस्थेत आढळले.

चांगली कथा-पटकथा, रुबाबदार, देखणे रूप असे १९७५ ते १९९० या काळात समीकरण आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) (७७). त्यांचे आकस्मित निधन झाले आहे.

१४ जुलै रोजी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात ते मृतावस्थेत आढळले. गेल्या काही महिन्यांपासून रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे इथल्या एका सदनिकेत भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. कुटुंब असताना ते एकटे का राहत होते, असा प्रश्न त्यांच्या निधनानंतर सर्वांना पडला आहे.

आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या चित्रपटात रवींद्र आणि गश्मीर महाजनी एकत्रच झळकले होते. असं असताना ते आपल्या कुटुंबासोबत का राहत नव्हते असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे.

रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे या दिवसांत त्यांच्याशी कोणीच संपर्क केला नाही का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

रवींद्र यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी तळेगावला रवाना झाला. शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे.

मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून रवींद्र महाजनी यांनी कलाविश्वात पदार्पण केले. त्यानंतर १९७४ साली झुंज या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा हॅण्डसम हंक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला.

त्यानंतर ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे चित्रपटही गाजले. तसेच ‘बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे प्रयोग केले.

१९९० नंतर चरित्र भूमिका, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आणि ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनात प्रवेश केला. २०१५ नंतर रवींद्र महाजनी 'काय राव तुम्ही', 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'पानीपत' अशा काही चित्रपटांत झळकले.