'या' क्षेत्रात करायचं होतं प्राजक्ता माळीला करिअर, म्हणाली "आजोबा आर्मीत, वडील सीआयडीमध्ये होते, तर मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:04 IST2025-09-29T17:57:44+5:302025-09-29T18:04:40+5:30

प्राजक्ता माळीने नुकतंच MHJ Unplugged ला दिलेल्या मुलाखतीत ही खास गोष्ट सर्वांसोबत शेअर केली.

मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). तिचा लूक, बोलण्याची स्टाइल यामुळे ती अनेक तरुणांची क्रश आहे.

८ ऑगस्ट १९८९ रोजी जन्मलेली प्राजक्ता मुळची पुणेकर आहे. प्राजक्ताचे वडील सीआयडीचे सेवानिवृत्त पोलिस हवालदार आहेत. तर आई गृहिणी आहे.

प्राजक्ताचे शालेय शिक्षण पुण्यातूनच पूर्ण झाले. पुण्याच्या कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाळा येथून तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. ललित कलाकेंद्र येथून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये बीए/एमएचे शिक्षण पूर्ण केले. प्राजक्ताने वयाच्या ७ व्या वर्षापासून भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

भरतनाट्यम क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीनंतर २०११ पासून तिने अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावले. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून पदवी आणि मास्टर डिग्री पूर्ण केली. येथे देखील ती टॉपरच होती. प्राजक्ताने 'तांदळा- एक मुखवटा' या सिनेमातून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. पण, प्राजक्ताला पहिल्यापासून अभिनेत्री व्हायचं नव्हतं. एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा तिचा विचार होता.

नुकत्याच सोनी मराठी चॅनेलचा नवीन शो एमएचजे अनप्लग्डला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या प्रवासावर भाष्य केलं. यावेळी प्राजक्ताने तिच्या करिअरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

यावेळी ती म्हणाली की, "लहानपणी जेव्हा विचारलं जायचं की तू कोण होणार ? त्यावर माझ्याकडे कोणतंही उत्तर नसायचं. म्हणजे माझं असं काही ठरलेलं नव्हतं".

ती म्हणाली, "मला कायमच समाजकार्यात रस होता. सेवा करावी असं मला वाटायचं कारण ते आमच्या घरात आहे. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील यांनी खूप लांबून पाणी वगैरे आणून पुण्यात झाड जगवली आहेत. ते पुण्यात शेती करायचे. आईचे वडील हे आर्मीमध्ये होते. माझे वडील सीआयडीमध्ये होते. त्यामुळे पहिल्यापासून वाटायचं की आपलंही हेच काम आहे. त्यामुळे असं वाटायचं की मी एकत्र पोलीस व्हावं किंवा शिक्षक व्हावं. पण डान्समध्ये माझ्या आईने तिच्या इच्छेने मला टाकलं".

प्राजक्ता पुढे म्हणाली, "माझा स्वभाव असा आहे की मला जर कोणती गोष्ट करण्यासाठी दिली तर मी झापड लावून त्यावर काम करते. एक टक्का पण बोट ठेवायला जागा नाही ठेवायची. माझं ठरलेलं नव्हतं की आयुष्यात काय करायचं. पण ते एकातून एक होत गेलं, माझ्या आईला मी डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. पण मला नृत्यात पुढचं शिक्षण घ्यावं म्हणून मी आर्ट्स घेतलं आणि ललित कला केंद्रातून पुढील शिक्षण घेतलं".

आज प्राजक्ता माळी ही 'प्राजक्तराज' हा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड चालवते. तसेच ती एक निर्मातीही आहे.

प्राजक्ताचे करिअर जरी बिझनेसवुमन, निर्माती, नृत्यांगणा आणि अभिनेत्री म्हणून गाजत असले, तरी तिच्या मनात आजही समाजसेवा आणि शिस्तीच्या क्षेत्राबद्दल आदर आहे. तिने प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांमुळेच ती आज इतकी यशस्वी झाली आहे यात शंका नाही.