मराठी अभिनेत्यानं बेडरूमला दिलाय 'काळा' रंग; पेंटरही सुरुवातीला हसले, त्यामागचं कारण सांगत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 16:24 IST2026-04-13T16:11:33+5:302026-04-13T16:24:34+5:30
लाखो तरुणींचा क्रश असलेल्या मराठी अभिनेत्यानं आपली बेडरूम काळ्या रंगाने रंगवलीय; कारण ऐकून सगळेच थक्क

आपलं घर, विशेषतः आपली बेडरूम ही आपली हक्काची 'पर्सनल स्पेस' असते. दिवसभराच्या थकव्यानंतर बेडरुम ही शांतता, विश्रांती आणि "रिचार्ज" (Recharge) होण्याची हक्काची जागा असते. या महत्त्वाच्या खोलीच्या भिंतीचे रंग, या खोलीतील सजावट फार विचार करूनच केली जाते.

सहसा भिंतींना पांढरा, क्रीम किंवा एखादा प्रसन्न रंग देण्याकडे आपला कल असतो. मात्र, मराठी सिनेसृष्टीतील एक असा अभिनेता आहे, ज्याने या सर्व चौकटी मोडून आपल्या बेडरूमला चक्क 'काळा' रंग दिला आहे.

अभिनेत्यानं जेव्हा आपल्या बेडरूमसाठी काळा रंग निवडला, तेव्हा रंगकाम करणाऱ्या कामगारांनाही धक्काच बसला. अभिनेत्याच्या या निर्णयावर सुरुवातीला कुणाचाच विश्वास बसत नव्हता. रंगकाम करणाऱ्या कामगारांना वाटलं की अभिनेता मस्करी करतोय.

तर तो अभिनेता आहे ललित प्रभाकर (Lalit Prabhakar). ललितनं आपल्या बेडरूमच्या भिंतीपासून ते छतापर्यंत सगळीकडे गडद काळा रंग दिला आला.

'मित्र म्हणे'ला दिलेल्या मुलाखतीत ललितला जेव्हा विचारण्यात आलं की, "तू संपूर्ण घराला काळा रंग दिला आहेस हे खरं आहे का?" तेव्हा त्याने यावर होकार देत त्यामागचं कारण सांगितलं.

ललित म्हणाला, "हो, हे खरं आहे. माझ्या घरातील एक खोली पूर्णपणे काळी आहे. जेव्हा मी रंगकाम करणाऱ्या माणसांना काळा रंग लावायला सांगितला, तेव्हा त्यांना तो विनोद वाटला आणि ते हसले. मी जेव्हा पुन्हा तोच रंग निश्चित केला, तेव्हा त्यांनी आश्चर्याने पुन्हा विचारले की नक्की कोणता रंग द्यायचा आहे? मी त्यांना निक्षून सांगितले की, मला खोलीत सगळीकडे हाच रंग हवाय".

मुलाखतीदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी ललितला गमतीत विचारले, "तुला नजर लागू नये म्हणून तू काळ्या खोलीत राहतोस का?" त्यावर ललितने हसून उत्तर दिले, "एकतर नजर लागू नये म्हणून आणि दुसरं म्हणजे मला तिथे छान वाटतं".

मात्र, या निवडीमागचं खरं कारण सांगताना ललित म्हणाला, "मला असं वाटतं की इतर रंगांमध्ये आपली नजर भिंतींवर मरते, पण काळ्या रंगात तसं होत नाही. आपण जेव्हा गावी बाहेर मोकळ्या आकाशाखाली झोपतो आणि वर बघतो, तेव्हा आपली नजर जशी अनंतापर्यंत जाऊ शकते, तसंच काहीसं मला या काळ्या खोलीत जाणवतं. काळ्या रंगाला अंत नसतो, त्यामुळे मला ती खोली कधीच छोटी वाटत नाही".

'जुळून येती रेशीमगाठी' मधील आदित्य असो किंवा 'आनंदी गोपाळ'मधील गोपाळराव, ललितने नेहमीच पडद्यावर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

ललित प्रभाकरच्या अनेक तरुणी चाहत्या आहेत. दिवसेंदिवस तो आणखी गुडलुकिंग आणि चार्मिंग दिसत आहे. ललित ३८ वर्षांचा झाला आहे. पण, अजून तो अविवाहित आहे.

















