Lata Mangeshkar : एक सामान्य मुलगी ते गानसम्राज्ञी...! फोटोंमधून पाहा लता दीदींचा संपूर्ण प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 10:44 IST2022-02-06T10:16:03+5:302022-02-06T10:44:08+5:30
Lata Mangeshkar Passes Away : ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

लता दीदींचे नाव हेमा होते. मग त्यांचे लता नाव कसे पडले तर वडीलांनी त्यांचे हेमा हे नाव बदलून त्यांना लता हे नवे नाव दिले. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका हे पात्र प्रचंड गाजले होते. या पात्रावरून वडिलांनी दीदींचे हेमा हे नाव बदलून त्यांचे लता असे नामकरण केले.
वयाच्या पाचव्या वर्षापासून वडिलांच्या नाटकात अभिनय करायला सुरूवात केली. यानंतर 1945 साली प्रदर्शित झालेल्या ‘बडी माँ’ या सिनेमातही त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती.
लतादीदींनी 1938 साली वयाच्या नवव्या वर्षी सोलापूरमधील नूतन थिएटरच्या नाटकासाठी राग कुंभवती आणि अन्य दोन गाणी गायली होती.
वयाच्या 13 व्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी सिनेमासाठी त्यांनी पहिले गाणे गायले होते. पण तुम्हाला माहित आहे का, सिनेमाची लांबी कमी करण्यासाठी ऐनवेळी हे अख्ख गाणं सिनेमातून हटवण्यात आले होते.
यानंतर त्याच वर्षी आलेल्या ‘पहिली मंगळागौर’ या सिनेमातील ‘नटली चैत्राची नवलाई’ हे गाणे त्यांनी गायले. हे त्यांचे पहिले गाणे ठरले.
पुढे हिंदी सिनेसृष्टीत त्यांचे पदार्पण झाले. वसंत जोगळेकर यांच्या ‘आप की सेवा में’ चित्रपटातील गाण्याने त्याचा हिंदी सिनेसृष्टीत प्रवास सुरु झाला.
लता यांना 1948 साली पहिला मोठा ब्रेक मिळाला. मजबूर सिनेमातील ‘दिल मेरा तोडा’ हे लता दीदींच्या आवाजात स्वरबद्ध केलेले गीत प्रचंड लोकप्रिय झाले. यानंतर महल या सिनेमातील ‘आएगा, आएगा, आएगा आनेवाला’ हे गीतही प्रचंड गाजले. पुढचा अख्खा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे.
लतादीदी त्यांच्या बालपणी फक्त एकच दिवस शाळेत गेल्या होत्या. शाळेत गेल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी बहीण आशासोबत इतर विद्यार्थ्यांना गाणं शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी अचानक वर्गात आलेल्या गुरुजींना ते अजिबात आवडलं नाही आणि ते त्यांना रागावले. त्यानंतर दीदी पुन्हा कधीही शाळेत गेल्या नाहीत.
लता मंगेशकर या अतिशय लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. सगळ्या भावंडांमध्ये त्या मोठ्या असल्याने घरची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी वयात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला कोरसमध्ये गाणे गायले. तसेच काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला.
लता मंगेशकर यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नसले तरी त्यांनी त्यांच्या भावंडांना शिक्षण दिले. त्यांनी घरची जबाबदारी खूपच चांगल्याप्रकारे पेलली.
एकदा गाणे रेकॉर्ड झालं की त्या ते कधी ऐकायच्या नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी स्वत: याचा खुलासा केला होता. एकदा रेकॉर्ड झालेलं गाणं मी कधीच ऐकलं नाही आजपर्यंत. मला ते ऐकायला भीती वाटायची, असं त्यांनी सांगितलं होतं.
एकदा गाणे रेकॉर्ड झालं की त्या ते कधी ऐकायच्या नाहीत. एका मुलाखतीत त्यांनी स्वत: याचा खुलासा केला होता. एकदा रेकॉर्ड झालेलं गाणं मी कधीच ऐकलं नाही आजपर्यंत. मला ते ऐकायला भीती वाटायची, असं त्यांनी सांगितलं होतं.