हातात हात घालून फिरताना दिसले केटी पेरी आणि जस्टिन ट्रूडो, सर्वांसमोर दिली नात्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 18:33 IST2025-10-26T18:28:28+5:302025-10-26T18:33:10+5:30
'रोमान्सची राजधानी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये केटी पेरी आणि जस्टिन ट्रूडो हातात हात घालून फिरताना दिसले.

पॉप जगतातील सुपरस्टार गायिका केटी पेरी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या डेटिंगच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांनीही आपल्या नात्याची सार्वजनिकपणे कबुली दिली आहे.

शनिवारी (२५ ऑक्टोबर) केटी पेरीच्या वाढदिवसानिमित्त दोघे क्रेझी हॉर्स पॅरिसमध्ये एका कॅबरे शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो टिपले.

हातात हात घालून चालत आणि फोटोग्राफर्ससमोर हसून पोज देत त्यांनी नात्याची कबुली दिल्याचं बोललं जातं आहे.

केटी पेरीने लाल रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला होता, तर जस्टिन ट्रूडो ऑल-ब्लॅक सूटमध्ये खूप हँडसम दिसत होते.

गेल्या काही महिन्यांपासून केटी पेरी आणि ट्रूडो यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या.

काही दिवसांपुर्वी या हाय-प्रोफाइल कपलचा एक अत्यंत रोमँटिक आणि प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत हे दोघे क्रूझवर एकमेकांना Kiss करताना दिसले होते.

हा प्रायव्हेट फोटो लीक झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. या दोघांना सर्वप्रथम कॅनडातील मॉन्ट्रियलमध्ये डिनर डेटवर एकत्र पाहण्यात आले होते.

कॅनडाचे हे माजी पंतप्रधान घटस्फोटित असून, तीन मुलांचे वडील आहेत. १८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर २०२३ मध्ये जस्टिन यांनी पत्नी सोफीपासून घटस्फोट घेतला होता.

केटीचं पहिलं लग्न ब्रिटिश विनोदवीर आणि अभिनेता रसेल ब्रँड याच्याशी ऑक्टोबर २०१० मध्ये झालं होतं. पण त्यांचा २०११ मध्ये घटस्फोट झाला. यानंतर २०१६ मध्ये तिने अभिनेता ऑरलँडो ब्लूम याला डेट करायला सुरुवात केली आणि २०१९ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना डेझी डोव्ह ब्लूम (Daisy Dove Bloom) नावाची मुलगी झाली. तथापि, अलीकडेच २०२५ मध्ये ते वेगळे झाले. आता केटी पेरी ही जस्टिन यांच्या प्रेमात आहे.

आता केटी पेरी आणि जस्टिन ट्रूडो यांनी सार्वजनिकपणे आपलं नातं स्वीकारल्यामुळे, जगभरात त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

















