धुरंधरच्या वादळातही 'या' सीरिजची होतेय चर्चा, वैवाहिक बलात्कारावर आधारित ६ भागाची सीरिज कुठे पाहाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:13 IST2026-03-24T14:12:35+5:302026-03-24T14:13:06+5:30
ही वेब सीरिज सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

भारतात लग्न म्हणजे 'पवित्र नातं' मानलं जातं. लग्नानंतर पत्नीच्या शरीरावर पतीचा 'मालकी हक्क' प्रस्थापित होतो, अशी एक अघोषित धारणा आजही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. वैवाहिक बलात्कार हा विषय चर्चिला जात नाही. मात्र, याच गंभीर विषयावर 'चिरैया' या सीरिजने भाष्य केले आहे.

बॉलिवूडची कसदार अभिनेत्री दिव्या दत्ता (Divya Dutta) हिची मुख्य भूमिका असलेली 'चिरैया' (Chiraiya) ही वेब सीरिज सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

'मॅरिटल कन्सेंट' (वैवाहिक संमती) आणि 'मॅरिटल रेप' (वैवाहिक बलात्कार) यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि आजही समाजात पडद्याआड राहणाऱ्या विषयाला या सीरिजने हात घातला आहे.

२० मार्चपासून ही सीरिज 'Jio Hotstar' वर प्रदर्शित झाली असून यातील संवादांनी प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडले आहे.

दिग्दर्शक शशांत शाह यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. सीरिजमध्ये एकूण ६ भाग असून प्रत्येक भाग सुमारे ३० ते ३५ मिनिटांचा आहे.

या सीरिजमध्ये दिव्या दत्ता एका अशा महिलेची भूमिका साकारत आहे, जी आपल्या कुटुंबाच्या परंपरेला आणि प्रतिष्ठेला सर्वोच्च मानते. मात्र, जेव्हा तिला समजते की तिचा स्वतःचा दीर आपल्या पत्नीवर जबरदस्ती करतोय, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते.

पीडित जेव्हा आपले दुःख दिव्याकडे व्यक्त करते, तेव्हा दिव्या संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा विरोध पत्करून दीराच्या पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.

'चिरैया' प्रदर्शित झाल्यापासूनच सोशल मीडियावर या विषयावरून दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, बहुतांश प्रेक्षकांनी या धाडसी विषयाचे कौतुक केले आहे.

वैवाहिक नात्यात स्त्रीची स्वायत्तता आणि तिची संमती किती महत्त्वाची आहे, हे या सीरिजमधून मांडण्यात आले आहे.

जर तुम्हाला सामाजिक विषयांवरील दर्जेदार आशय पाहायला आवडत असेल, तर 'चिरैया' ही सीरिज तुमच्यासाठी मस्ट-वॉच आहे. ही सीरिज जिओ हॉटस्टारवर हिंदीव्यतिरिक्त तमीळ, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली, हरयाणवी, राजस्थानी, भोजपुरी, ओडिया, मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित झाली आहे.

















