Sonu Sood : मदतीसाठी इतका पैसा येतो कुठून? अखेर सोनू सूदने सांगितलं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 01:13 PM2023-02-20T13:13:59+5:302023-02-20T13:23:48+5:30

Sonu Sood : कोरोना आटोक्यात आला, पण सोनू सूदच्या मदतीचा ओघ आटला नाही. आजही रोज शेकडो लोक सोनूकडे मदत मागतात आणि सोनू त्यांना शक्य ती सर्व मदत करतो...

कोरोना महामारीच्या काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) दिवसरात्र खपला. स्थलांतरित मजूरांना त्यानं केलेली मदत अख्ख्या जगानं पाहिली.

कोरोना आटोक्यात आला, पण सोनूच्या मदतीचा ओघ आटला नाही. आजही रोज शेकडो लोक सोनूकडे मदत मागतात आणि सोनू त्यांना शक्य ती सर्व मदत करतो.

लोकांना रोजगार देण्यापासून तर त्यांच्या शिक्षणाचा भार उचलण्यापर्यंत, उपचारासाठी मदत करण्यापर्यंत अनेक गोष्टी सोनूने केल्या. आजही करतोय. अनेकांसाठी तो केवळ अभिनेता नसून देवदूत ठरला आहे.

अलीकडेच सोनूने 'आप की अदालत' या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी रजत शर्माने त्याला अनेकांच्या मनातला प्रश्न विचारला. लॉकडाऊनच्या काळात इतके मजूर आणि विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यासाठी पैसे कुठून आणले? असा हा प्रश्न होता.

या प्रश्नाला उत्तर देताना सोनू सूद म्हणाला, 'जेव्हा मी हे सर्व सुरू केलं, तेव्हा मला माहित होतं की लोकांच्या गरजा बघता मी दोन दिवसही टिकू शकणार नाही. कशी भर घालायची, असा विचार मी करत होतो. त्यावेळी मी ज्या ब्रँडवर काम करत होतो ते सर्व चॅरिटीसाठी वापरले.

त्याने सांगितलं, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, कॉलेज, शिक्षक, फार्मास्युटिकल कंपन्यांना मी मदतीसाठी राजी केले. तुम्हाला मी, माझं ब्रँड नेम हवं आहे ना, तर मी फुकट काम करेन, असं मी त्यांना म्हणालो आणि ते माझ्यासोबत जुळत गेलेत.

पुढे तो म्हणाला, काही मोठ्या एनजीओने मला फोन केलेत. सोनू देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. तू करू शकणार नाहीस, असं ते मला म्हणायचे. पण माझ्या घरासमोर मदतीची आस घेऊन येणाऱ्यांना मी नाकारू शकणार नव्हतो.

तो म्हणाला,आज जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत, कोणत्याही लहान जिल्ह्यात किंवा लहान राज्यात, कोणीही, कुठेही, तुम्ही बोलू शकता, मी कोणाला शिकवू शकतो, मी कोणाला उपचार मिळवून देऊ शकतो, मी कोणाला नोकरी मिळवून देऊ शकतो, तुम्ही कॉल करा, मी ते करून देईन.

माझं सोशल मीडिया अकाऊंट हँडल करण्यासाठी मी कोणतीही टीम ठेवलेली नाही. मी स्वत: प्रत्येक ट्विटला उत्तर देतो, असंही त्याने आप की अदालत या कार्यक्रमात सांगितलं.