'नो किस गर्ल' नावाने प्रसिद्ध होती बॉलिवूड अभिनेत्री, दिलीप कुमार यांच्यासोबत केलं काम; 'ती' एक चूक अन् करिअर संपलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:44 IST2026-03-25T16:27:09+5:302026-03-25T16:44:53+5:30
नशीबाची साथ अन् बनली बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री,कोण आहे ती?

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सौंदर्य आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असणाऱ्या अभिनेत्रींचा उल्लेख करायचा झाला तर अभिनेत्री निम्मी यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.'बरसात', 'आन', 'अमर', 'उडन खटोला', 'बसंत बहार' आणि 'मेरे महबूब' या गाजलेल्या चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या निम्मी यांचा आज स्मृतीदिवस.

उत्तर भारतातील आग्रा शहरात १८ फेब्रुवारी १९३२ ला नवाब बानो यांचा जन्म झाला. निम्मी यांचं खरं नाव वाब बानो. आई वहिदाबाई एक प्रसिध्द गायिका व अभिनेत्री होत्या. त्यांनी १९३० च्या दशकात प्रसिध्द चित्रपट निर्माते मेहबूब खान यांच्यासोबत काम केलं होतं. अवघ्या ११ वर्षांच्या असताना त्यांच्या आईचं निधन झालं.

निम्मी यांनी कधी चित्रपटात काम करण्याचा विचारच केला नव्हता. पण त्यांच्या आईसोबत १९३० काम केलेल्या प्रसिध्द चित्रपटनिर्माते मेहबूब खान यांनी एकदा नवाबबानोला त्यांची निर्मिती असलेल्या अंदाज या चित्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी बोलावले.त्यावेळी त्यांची भेट अभिनेते राज कपूर यांच्याशी झाली.

त्याकाळात राज कपूर यांच्या बरसात या चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. मुख्य नायिकेच्या भूमिकेत होत्या अभिनेत्री नर्गीस पण सहाय्यक अभिनेत्रीकरिता ते एका तरुण मुलीच्या शोधात होते. नवाबबानो सोबत झालेल्या गप्पांतून त्यांना जाणवले की आपला सहाय्यक अभिनेत्रीचा शोध संपला आहे. त्यांनी अभिनेता प्रेमनाथ यांच्यासोबतच्या भूमिकेसाठी एका छोट्या स्क्रीन टेस्ट नंतर नवाबबानो यांना भूमिका दिली.सोबतच त्यांना स्क्रीननेम दिलं ते म्हणजे निम्मी.

'बरसात' च्या यशानंतर, निम्मी 'दीदार','आन', 'कुंदन' 'मेरे महबूब' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या. 'आन' या चित्रपटाची सबटायटल्स १७ भाषांमध्ये करण्यात आली होती आणि हा चित्रपट तब्बल २८ देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्या काळातील भारतीय चित्रपटासाठी हे यश अभूतपूर्व होते. या चित्रपटामुळेच हिंदी चित्रपटांसाठी आंतरराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्र खुलं झालं.

'नो किस गर्ल' नावाने मिळाली प्रसिद्धी
लंडनमध्ये या चित्रपटाच्या प्रिमीअरला निम्मी गेल्या होत्या. या प्रिमीअरला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड एटली हे देखील उपस्थित होते. पाश्च्यात्य संस्कृतीनुसार अभिनेता एरोल फ्लिन यांनी निम्मी यांच्या हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पण निम्मी यांनी नम्रपणे हात मागे घेत, "मी एक भारतीय मुलगी आहे; तुम्ही असे करू शकत नाही!" असे सांगितले. लंडनमधील प्रेसच्यादृष्टीने ही घटना अतर्क्य होती. प्रसारमाध्यमांनी निम्मी यांना "नो किस गर्ल’ या मथळ्याखाली प्रसिध्दी दिली.

'ती' एक चूक अन् करिअरला लागली उतरती कळा
१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरे महबूब’ या चित्रपटात निम्मी यांना लीड हिरोईनचा रोल ऑफर झाला होता. दिग्दर्शक हरमन सिंह रवैल यांनी निम्मी यांना चित्रपटात लीड रोल दिला होता. पण निम्मी यांनी लीड रोलऐवजी सेकंड लीड रोल हवा म्हणून अडून बसल्या.निम्मी यांच्या या हट्टापुढे दिग्दर्शकानेही हार मानली आणि सेकंड लीड रोल निम्मी यांना देऊन लीड रोलसाठी साधनाला साईन केले. चित्रपट रिलीज झाला आणि सगळेच उलटे झाले. या चित्रपटाने साधनाला स्टार बनवले आणि निम्मी यांच्या करिअरला ओहोटी लागली. यानंतर निम्मी यांना दुय्यम रोल ऑफर होऊ लागले.

रुपेरी पडद्यावरील दिलीप कुमार यांच्यासोबतच्या त्यांच्या केमिस्ट्रीचे प्रेक्षकांनी कौतुक केले. त्यामुळेच त्यांना महबूब खान यांच्या 'आन' या चित्रपटामध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत भूमिका मिळाली.वैयक्तिक जीवनात निम्मी यांनी आन या चित्रपटाची पटकथा लिहिणारे लेखक दिग्दर्शक एस.अली रझा यांच्याशी विवाह केला होता.

अभिनयासोबत निम्मी यांचा आवाजही सुंदर होता.'बेदर्दी' या चित्रपटामधील 'नदिया जाने ना दे' आणि 'शमा' या चित्रपटातील 'शगुफ्ती लताफत का' या गाण्यांचे पार्श्वगायन केलं होतं. २००७ मध्ये त्यांचे पती एस. अली रझा यांचे निधन झाले. त्यानंतर निम्मी जुहू येथील एका अपार्टमेंटमध्ये एकट्याच राहात होत्या. वृध्दापकाळाने २५ मार्च २०२० ला वयाच्या ८८ व्या वर्षी निम्मी यांनी या जगाचा निरोप घेतला.

















