'तेरे इश्क में' फेम मोहम्मदची पत्नी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; कुटुंबाचा होता लग्नाला विरोध

By देवेंद्र जाधव | Updated: December 3, 2025 17:03 IST2025-12-03T16:48:26+5:302025-12-03T17:03:54+5:30

तेरे इश्क में सिनेमातील मोहम्मदची झिशान अय्यूबची पत्नी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. कुटुंबाचा विरोध होता म्हणून दोघेही गोव्याला पळून गेले होते. जाणून घ्या कोण आहे ती?

'तेरे इश्क में' सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमात धनुष आणि क्रिती सेनन हे दोघे प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमातील आणखी एका अभिनेत्याची चांगलीच चर्चा झाली

हा अभिनेता म्हणजे मोहम्मद झिशान अय्यूब. 'तेरे इश्क में' सिनेमात छोट्याश्या भूमिकेत दिसलेल्या मोहम्मदने चांगलाच भाव खाल्ला.

मोहम्मदची पत्नी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. मोहम्मदच्या पत्नीचं नाव आहे रसिका आगाशे.

रसिका ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून तिने अनेक सिनेमा, मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केलंय. मोहम्मद आणि रसिका दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शिकायला होते.

रसिका आणि मोहम्मद यांची तिथेच मैत्री झाली. मोहम्मद मुस्लीम आहे तर रसिका हिंदू. त्यामुळे दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे घरच्यांचा रागाचा सामना करावा लागू नये म्हणून ते दोघे गोव्याला पळून गेले होते.

चार महिने त्यांनी घरच्यांशी बोलणं केलं नव्हतं. परंतु नंतर त्यांनी मुंबईत येऊन २००७ मध्ये लग्न केलं. मोहम्मद आणि रसिकाच्या घरच्यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती. रसिका आणि मोहम्मद यांना एक मुलगीही आहे.

अशाप्रकारे रसिका आणि मोहम्मद यांनी एकमेकांच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात केलं. रसिकाने 'पेट पुराण', '१ ते ४ बंद', 'भाऊबळी' अशा मराठी कलाकृतींमध्ये अभिनय केला आहे. याशिवाय सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या 'तिचं शहर होणं' सिनेमाचं दिग्दर्शन रसिकाने केलं आहे.