पाकिस्तानातून पळून आले आणि बनले बॉलिवूडचे सुपरस्टार, आता ऑपरेशन सिंदूरचं केलं कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:46 IST2025-05-20T17:33:55+5:302025-05-20T17:46:47+5:30
अशा दिग्गज कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत, जे पाकिस्तानातून भारतात आले आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बनले.

सध्या पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणावाची परिस्थिती आहे. दहशतवादाच्या विरोधात असलेल्या भारताच्या या लढाईत पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. तर आज आपण एका अशा दिग्गज कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत, जे पाकिस्तानातून भारतात आले आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बनले.
ते अभिनेते आहेत सुरेश ओबेरॉय. ते मूळचे पाकिस्तानचे आहेत. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं होतं. सुरेश ओबेरॉय यांचा जन्म १७ डिसेंबर १९४६ रोजी आताच्या पाकिस्तानमधील क्वेटामध्ये झाला होता.
सुरेश यांचे वडील एक मोठे रिअल इस्टेट एजंट होते आणि त्याचं कुटुंब खूप श्रीमंत होतं. पण, जेव्हा भारत-पाकिस्तान फाळणी झाली, तेव्हा सुरेश यांच्या वडिलांना त्यांची सर्व संपत्ती सोडून मुलगा आणि पत्नीसह भारतात पळून यावं लागलं होतं. त्यावेळी सुरेश फक्त एक वर्षांचे होते.
सुरेश यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा ते लहानपणी निर्वासित म्हणून राहत होते, तेव्हा कधीकधी त्याच्या घरात खायला भाकरीही नसायची. यानंतर, त्यांचे वडील हे पाकिस्तानात असलेली संपत्ती विकण्यासाठीही पुन्हा पाकिस्तानात गेले होते.
सुरेश यांच्या वडिलांनी पाकिस्तानात गेल्यानंतर वेषांतर केलं आणि मुस्लिम बनून मालमत्ता विकली. त्यानंतर ते पैसे घेऊन ते भारतात परतले आणि त्या पैशांनी त्यांनी भारतात पुन्हा व्यवसायसुरु केला.
सुरेश ओबेरॉय यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झालं तर, त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शिक्षणानंतर, सुरेश ओबेरॉय यांनी रेडिओ होस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांच्या चांगल्या आवाजामुळे ते खूप प्रसिद्ध झाले.
सुरुवातील त्यांना नायक म्हणून काही चित्रपट मिळाले पण ते चालले नाहीत. यानंतर त्यांंनी सहायक भूमिकांवर लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. लावरिस, विधाता, नमक हलाल, कामचोर यांसारख्या चित्रपटांतून त्यांना लोकप्रियता मिळाली.
अलिकडेच सुरेश ओबेरॉय हे रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' मध्ये पाहायला मिळाले.
सुरेश ओबेरॉयप्रमाणेच त्यांचा मुलगा विवेक ओबेरॉयही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. विवेक ऑबरॉयचं ऐश्वर्या रॉयसोबत नाव जोडलं गेलं होतं. विवेक आणि सलमान खान यांच्यातील भांडण तर सर्वश्रुत आहे.
नुकतंच एका मुलाखतीमध्ये सुरेश यांनी ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं आणि पाकिस्तानविरुद्ध संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "तुम्ही पाकिस्तानला आपला शेजारी म्हणत आहात, पण मी त्याला आपला शत्रू देश म्हणेन. मला कोणताही गायक, अभिनेता किंवा कोणताही पाकिस्तानी इथे येऊ नये असं वाटतं, अगदी क्रिकेट सामन्यासाठीही".