"बाभळगावला येणं म्हणजे जणू तुमच्या कुशीत..." विलासराव देशमुखांच्या जन्मदिनी रितेशची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:47 IST2025-05-26T15:27:45+5:302025-05-26T15:47:03+5:30
विलासराव देशमुखांच्या जन्मदिनी रितेशनं भावुक पोस्ट शेअर केली आहे.

राजकारणातले एक दिलखुलास व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (Vilasrao Deshmukh) स्व.विलासराव देशमुख यांची आज जयंती (२६ मे २०२५) आहे.
विलासराव देशमुख यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त आज सकाळी ९ वाजता बाभळगावातील विलासबाग येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
विलासराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशमुख कुटुंबीय हे बाभळगाव इथल्या विलासबागेत उपस्थित राहिलं.
स्व.विलासराव देशमुख यांना देशमुख कुटुंबीयांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी संपुर्ण कुटुंब भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या ८०व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
त्यानं लिहलं, "आधी आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा होता पप्पा, पण आता तुमच्या नातवंडांची हा दिवस "आजोबा डे" म्हणून साजरा करण्याची इच्छा आहे. लातूर, बाबळगावला येणं म्हणजे जणू तुमच्या कुशीत परत धाव घेतल्यासारखं वाटतं. समाधान, तृप्ती, आनंद आणि निखळ शांती मिळते. ज्यामुळे सगळं ठीक होतं", असं त्यानं म्हटलं.
पुढे तो म्हणतो, "आजही तुमच्या त्या एक स्पर्शासाठी, एक मिठीसाठी आणि त्या एका हास्यसाठी हे हृदय आसुसलेलं आहे. जे सगळं ठीक करतं.आम्हाला माहितेय की तुम्ही वरून आमच्याकडे पाहत आहात.. तुमची खूप आठवण येते पप्पा", या शब्दात रितेशनं भावना व्यक्त केल्यात.
रितेशनं विलासराव यांचे काही जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिलाय. या फोटोत लहानपणीचा रितेश वडील आणि भावासोबत दिसून येतोय.
रितेश देखमुखनं शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी कमेंट करत विलासराव देशमुख यांना आदरांजली दिली.
बाभुळगावच्या सरपंचपदापासून सुरु केलेला प्रवास ते महाराष्ट्राचे दोन वेळेसचे मुख्यमंत्री, अशी संघर्षमय प्रवास म्हणजे विलासराव देशमुख यांनी केला होता. राजकारणातले राजहंस अशी त्यांची ओळख होती. त्यांची अदा, भाषण शैली आणि शब्दांवर असलेली पकड याची भुरळ विरोधकांना देखील होती. आता विलासराव देशमुख यांचं निधन होऊन १३ वर्ष उलटली आहेत. मात्र, त्यांच्या आठवणी आज देखील कायम आहेत.