७५ वर्षांचे झाले नाना पाटेकर! मुंबईत नाही तर मग कुठे राहतात? जगतात अगदी साधं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:38 IST2026-01-01T16:29:21+5:302026-01-01T16:38:21+5:30

नाना पाटेकर यांचा फक्त मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही एक वेगळाच दरारा आहे.

अभिनेते नाना पाटेकर आज आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त संपूर्ण सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण नाना पाटेकरांविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. तुम्हाला माहियेत आहे का? ज्यांना सगळे 'नाना' म्हणून ओळखतात, त्यांचं 'खरं नाव' नाना नाहीच.

महाराष्ट्रातील रायगड याठिकाणी नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ मध्ये झाला. मराठी कुटुंबात जन्म झालेल्या नाना पाटेकर यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर असं आहे. त्यांचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती आहे.

फिल्मी दुनियेत त्यांना सर्वजण 'नाना' पाटेकर या नावाने ओळखतात. 'द लल्लनटॉप' ला दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी सांगितले होते की, "माझ्या आईची एक मैत्रीण होती. जवळजवळ बहिणीसारखी, लहानपणी ती मला प्रेमाने 'नाना' म्हणायची. तेव्हापासून लोक मला नाना बोलायला लागले".

नाना पाटेकरांच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी १९७८ मध्ये 'गमन' या चित्रपटातून पदार्पण केले. मात्र, खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'परिंदा' चित्रपटामुळे. या चित्रपटातील त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्यांनी असंख्य सदाबहार सिनेमात काम केले आहे. गंभीर, रोमँटिक, विनोदी अशा विविध धाटणीच्या भूमिका त्यांनी निभावल्या आणि अजरामर केल्या.

अभिनयासोबतच आपल्या साध्या राहणीमानाने नाना अनेकांचे लक्ष वेधून घेतात. बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावूनही नाना मुंबईपासून दूर पुण्यातील एका छोट्याशा गावात राहतात.

नानांचे पुण्यात खडकवासला येथे एक प्रशस्त फार्महाऊस आहे. नाना आपला जास्तीत जास्त वेळ तिथेच घालवतात. ते स्वतः शेती करतात. त्यांनी तिथे काही गायी आणि म्हशीदेखील पाळल्या आहेत. निसर्गाच्या सानिध्यात मातीशी नातं जोडून राहणं त्यांना शांतता देतं.

मुंबईत काम करत असताना नाना त्यांच्या अंधेरी येथील १ BHK फ्लॅटमध्ये राहतात. हा फ्लॅट त्यांनी ९० च्या दशकात खरेदी केला होता.

दरम्यान, नाना पाटेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या बायकोचे नाव नीलकांती पाटेकर असे आहे. त्यांच्या मुलाचे नाव मल्हार पाटेकर असे आहे.