आई-वडील दोघेही सुपरस्टार, मात्र लेक ठरली फ्लॉप, गाशा गुंडाळून गेली परदेशात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 08:00 AM2023-07-27T08:00:00+5:302023-07-27T08:00:01+5:30

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची लहान मुलगी रिंकी खन्ना हिला खूप कमी लोक ओळखतात.

बॉलिवूडच्या झगमगाटात काही चेहरे येतात आणि अचानक अंधारात गुडूप होतात. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची लहान लेक रिंकी खन्ना (Rinke Khanna ) त्यापैकीच एक.

राजेश खन्ना यांची पत्नी अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि मुलगी अभिनेत्री ट्विंकल खन्ना या दोघींची नावे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत येतात. मात्र त्यांची लहान मुलगी रिंकी खन्ना हिला खूप कमी लोक ओळखतात.

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ती इंग्रजी व हिंदी नाटकात काम करत होती. रिंकीचे खरे नाव रिंकल होते. मात्र तिने काही काळानंतर तिच्या नावतून एल हे अक्षर काढले. यामुळे तिचे नाव रिंकी झाले.

1999 साली ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला. या चित्रपटात तिचा हिरो होता डिनो मोरिया. यानंतर रिंकी अभिनेता गोविंदासोबत ‘जिस देश में गंगा रहता है’ या चित्रपटात दिसली. पाठोपाठ मुझे कुछ कहना है, ये है जलवा, प्राण जाए पर शान ना जाए, झंकार बीट्स आणि चमेली या सिनेमात ती झळकली.

आज रिंकी खन्नाचा वाढदिवस. 27 जुलै 1977 रोजी जन्मलेली रिंकी ट्विंकलपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रिंकीनेही बॉलिवूड डेब्यू केला.

तिचा बॉलिवूड प्रवास उण्यापु-या पाच वर्षांचा राहिला. तिचा 2004 साली शेवटचा चित्रपट ‘चमेली’ आला होता. तेव्हापासून ती बॉलिवूडमधून गायब झाली आहे.

रिंकीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये फक्त आणि फक्त 9 चित्रपटात काम केले. हिंदी चित्रपटासोबत रिंकीने तमिळ चित्रपटात देखील आपले नशिब आजमावले.

रिंकीला चित्रपटात म्हणावे असे यश मिळाले नाही. यानंतर तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये तिने उद्योगपती समीर सरन याच्यासोबत लग्न केले.

तिला एक मुलगा व मुलगी आहे. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहते.रिंकी मीडिया आणि सोशल मीडियापासून नेहमी चार हात लांबच राहते. ती कोणत्याच कार्यक्रमात दिसत नाही.

रिंकी जरी सध्या बॉलिवूड जगतापासून लांब असली तरी आज देखील तिचे ‘मुसु मुसु हासी’ हे गाणे लोक विसरलेले नाहीत. या गाण्याला आवाज गायक शान याने दिला होता.