'गदर 2' च्या अभिनेत्रीने केला डिप्रेशनबाबत खुलासा, म्हणाली, "अनेक महिने खोलीत बंद..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 03:52 PM2023-08-09T15:52:47+5:302023-08-09T16:00:26+5:30

अभिनेत्री सिमरत कौर रंधावा (Simrat Kaur Randhawa) 'गदर 2' (Gadar 2) सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. फिल्म रिलीजआधी अभिनेत्रीने आपल्या स्ट्रगलच्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला तिच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले ज्यामुळे ती पूर्णपणे तुटली होती मात्र तिच्या आईने दिलेल्या पाठिंब्यामुळे ती सावरली.

सिमरत कौर रंधावाने 2017 मध्ये करिअरला सुरुवात केली. तेलुगू फिल्म 'प्रेमथो मी कार्तिक' या सिनेमातून तिने पदार्पण केले. तिला खरंतर अभिनयात यायचं नव्हतं. मात्र डेब्यू केल्यानंतर तिला समजलं की हेच तिचं जग आहे. पहिल्या सिनेमानंतर मात्र तिला पुढे काम मिळालं नाही.

सिमरनला तेव्हा आऊटसायडर असल्याचं जाणवलं. काहीही सहजरित्या मिळत नाही हेही तिला कळलं. चांगली संधी मिळेपर्यंत स्ट्रगल करावंच लागतं हे तिला समजलं. या काळात तिला डिप्रेशनही आलं. महिनोन्महिने तिने स्वत:ला खोलीत बंद करुन घेतलं आहे. दिवसरात्र ती रडली आहे.

सिमरत एका मुलाखतीत म्हणाली, 'योग्य वेळ येईपर्यंत वाट बघावी लागते. यासाठी सतत प्रयत्न आणि स्ट्रगल करावा लागतो. तुमच्याजवळ कोणाचाच कॉन्टॅक्ट नसतो, चांगले लोक नसतात ज्यांच्याशी संपर्क करता येईल. तरी तुमची अभिनेता/अभिनेत्री होण्याची इच्छा असते. मला तर प्रश्न पडायचे, कुठून सुरुवात करु? ऑडिशन कशी देऊ?'

ती पुढे म्हणाली,'मी साऊथमधून सुरुवात केली. पण मला पहिल्या सिनेमानंतरही काम मिळालं नाही. प्रोडक्शन हाऊससोबत माझी मीटिंग झाली. त्यांनी माझी स्तुती केली.मात्र त्यानंतर काहीच झालं नाही. मला वाटायचं माझ्यात नेमकं काय कमी आहे, मला काम का नाही मिळत? मला तर साऊथमध्ये काम करण्यासाठीही स्ट्रगल करावा लागला होता.'

2019 साल सिमरतसाठी फार वाईट होतं. तेव्हा सिमरतने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. ती डिप्रेशनमध्ये गेली. कित्येक महिने ती बंद खोलीत रडायची.फेल होण्याची भावना मला मनातल्या मनात खात होती. आपण आयुष्यात काहीच करु शकत नाही असंच तिला वाटायचं.

आता सिमरतचं नशीब उजळलं आहे. सनी देओलच्या ब्लॉकबस्टर 'गदर' च्या सिक्वलमध्ये तिला महत्वाची भूमिका साकारायला मिळत आहे. 'गदर 2'मध्ये तिने सनी देओलच्या सूनेची भूमिका साकारली आहे. ११ ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होतोय.