Divya Bharti Death Anniversary : दिव्या भारतीसोबत ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 01:13 PM2022-04-05T13:13:18+5:302022-04-05T13:19:32+5:30

Divya Bharti Death Anniversary : एकेकाळी सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाहीत. 1993 साली आजच्याच दिवशी (5 एप्रिल) अवघ्या 19 वर्षांच्या दिव्यानं या जगाचा निरोप घेतला होता.

एकेकाळी सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाहीत. आता फक्त तिचे सिनेमे आणि तिच्या मृत्यूचं गूढ एवढ्याच तिच्या आठवणी शिल्लक आहेत. 1993 साली आजच्याच दिवशी (5 एप्रिल) अवघ्या 19 वर्षांच्या दिव्यानं या जगाचा निरोप घेतला होता.

5 एप्रिल 1993 मध्ये मुंबईतील वर्सोवा येथील तुलसी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळून दिव्याचा मृत्यू झाला होता. रात्री 11.30 च्या दरम्यान ही घटना घडली होती. दिव्याचा अपघात झाल्यानंतर तिला तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान तिचं निधन झाला होतं.

काहींच्या मते, दिव्याचा मृत्यू हा घातपात होता. तर काहींच्या मते, तो अपघात होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्या भारतीचा मृत्यू होणं हा एक अपघात होता. मात्र त्या रात्री काय घडलं होतं, हे दिव्याच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

आज दिव्याचे वडील ओपी भारती हेही या जगात नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच त्यांचं निधन झालं होतं. मात्र काही वर्षांआधी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लेकीच्या मृत्यूआधीची कहाणी सांगितली होती.

ओपी म्हणाले होते की,‘ज्या दिवशी तिचा मृृत्यू झाला त्यादिवशी मी इथेच होतो. 4 एप्रिलला रात्री 3-4 वाजता ती घरी आली होती. सकाळी तिला मद्रासला जायचे होते. पण तिने नकार दिला. पापा, पायाला दुखापत झाली आहे, तेव्हा मी जाणार नाही, असं ती म्हणाली. मग ती फ्लॅटबद्दल बोलली. पापा, मी एक फ्लॅट बघितलाये, शोमू मुखर्जींचा. तो घ्यायचा आहे. आम्ही तो फ्लॅट पाहायलाही गेलो.’

पुढे त्यांनी सांगितलं होतं की, ‘मग आम्ही जुन्या फ्लॅटवर परत आलो. गप्पा सुरू असतानाच तिला नीता लूलाचा फोन आला. फ्लॅटचे डिझाईन वगैरे डिस्कस करण्यासाठी. रात्री नीता लूला व तिचा पती दिव्याला भेटायला आलेत. साजिद (नाडियाडवाला) बाहेर निघाला होता. घरी मोलकरीण, दिव्या, नीता व तिचा पती होते. ते गप्पा मारत होते आणि मग थोड्याच वेळात...’

रिपोर्टनुसार, त्या रात्री घरात फक्त दिव्या आणि तिची कामवाली अमृता दोघीच होत्या. नीता, तिचा पती आणि दिव्या एकमेकांशी गप्पा मारत ड्रिंक्स एन्जॉय करत असताना दिव्या बाल्कनीत गेली. ती एकदम काठावर उभी होती. जशी पलटली, तसा तिचा बॅलन्स बिघडला आणि ती पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळली.

दिव्या भारतीच्या मृत्यूविषयी अनेक वेगवेगळ्या स्टोरीज सांगितल्या जातात. तिची हत्या केल्याचा दावाही केला जातो. पण दिव्याच्या वडिलांनी या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यादिवशी दिव्या थोडी नशेत होती. पण फार नशेत नव्हती आणि लोक म्हणतात तशी ती डिप्रेशनमध्येही नव्हती, असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं होतं.

डोक्याला झालेली दुखापत आणि अंतर्गत रक्तस्रावामुळे दिव्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पाच वर्षे तपास करूनही पोलिसांना तिच्या मृत्यूचं कोणतंही ठोस कारण सापडलं नाही. परिणामी, ती दारूच्या नशेत असल्याने बाल्कनीतून खाली पडली, असं कारण पोलिसांच्या अहवालात नमूद केलं आहे.