Dharmendra: ९०वा वाढदिवस अन्...; अखेर धर्मेंद्र यांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच राहिली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:59 IST2025-11-24T17:06:49+5:302025-11-24T17:59:11+5:30
बॉलिवूडचे 'ही मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. वयाची नव्वदी गाठली तरी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. असं असलं तरी त्यांची शेवटच्या सिनेमाबाबतची ती इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

Dharmendra Passed Away: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. ते ८९ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. पण प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.

नंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पण अखेर आज(२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तर देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.

काही दिवसांनंतर म्हणजेच ८ डिसेंबरला धर्मेंद्र यांचा ९०वा वाढदिवस साजरा होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडचे 'ही मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. वयाची नव्वदी गाठली तरी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. असं असलं तरी त्यांची शेवटच्या सिनेमाबाबतची ती इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

धर्मेंद्र यांना ९०वा वाढदिवस साजरा करायचा होता. त्यासोबतच त्यांचा शेवटचा सिनेमा पाहण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.

'इक्कीस' हा धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा ठरला. हा सिनेमा येत्या २५ डिसेंबरला प्रदर्शित होतो आहे. हा सिनेमा पाहण्याची इच्छा त्यांनी मुलाखतीत बोलून दाखवली होती.

"मी म्हातारा झालोय पण सिनेमा हे माझं जीवन आहे. हा सिनेमा पाहूनच मी डोळे मिटेन", असं धर्मेंद्र 'इक्कीस' सिनेमाबाबत म्हणाले होते. या सिनेमात त्यांनी २१ वर्षीय अमर सैनिक अरुण खेतरपाल यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

धर्मेंद्र यांचे अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर सुपरहिट यश मिळालं.

धर्मेंद्र यांच्या शेवटच्या ठरलेल्या 'इक्कीस' या सिनेमाचं पोस्टर आज सकाळीच त्यांच्या निधनाच्या काही तास आधी रिलीज करण्यात आलं होतं.

धर्मेंद्र यांच्या मागे आता त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर, दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी, मुलगा सनी देओल, बॉबी देओल, मुली ईशा, अहाना, अजिता, विजेता आणि १६ नातवंडं असा परिवार आहे.

















