बॉलिवूड अभिनेत्री अन् Cannes Film Festival चा संबंध काय? 'हे' आहे त्यामागचं खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 01:55 PM2023-05-17T13:55:50+5:302023-05-17T14:06:09+5:30

Cannes Film Festival 2023 ला सुरुवात झाली आहे. अनुष्का शर्मा यंदा कान्समध्ये पदार्पण करत आहे.

मनोरंजन क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित इव्हेंट्सपैकी एक म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival 2023). कान्स २०२३ ला सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवर आपल्या फॅशनचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहेत.

कान्समध्ये केवळ अभिनेत्रीच नाही तर संगीतकार, दिग्दर्शकही सहभागी होत असतात. जगभरातील शॉर्टलिस्ट केलेले सिनेमे या महोत्सवात दाखवले जातात. पण कान्सचा आणि बॉलिवूड अभिनेत्रींचा काय संबंध हा प्रश्न अनेकांना पडला असेलच.

१६ मे ते २७ मे पर्यंत ७६ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. फ्रान्सच्या कोस्टल एरिया फ्रेंच रिव्हेरा येथे हा महोत्सव पार पडत आहे. जगभरातील सेलिब्रिटी या महोत्सवात सहभागी होतात.

कान्स फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी काही मोजके भारतीय सेलिब्रिटी सहभागी होतात. दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, कंगना रणौत, हिना खान सारख्या अनेक अभिनेत्रींनी कान्समध्ये हजेरी लावली आहे. मात्र या अभिनेत्री कोणत्याही फिल्मसाठी तिथे जात नाहीत तर विशिष्ट ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी त्या सहभागी होत असतात.

आंतरराष्ट्रीय कॉस्मेटिक ब्रँड लॉरिअल पॅरिस गेल्या अनेक वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलचा ब्यूटी पार्टनर आहे. ऐश्वर्या राय आणि सोनम कपूर या लॉरिअल पॅरिसच्या ब्रँड अँबेसिडर आहेत. तर कंगना रणौत grey groose vodka या ब्रँडला प्रमोट करण्यासाठी तिथे जाते. हा ब्रँड फेस्टिव्हलचा स्पॉन्सर आहे.

थोडक्यात सांगायचं तर ब्रँडच्या आमंत्रणावरुन या अभिनेत्री कान्समध्ये सहभागी होतात. याचा फेस्टिव्हलमधील चित्रपटांशी काहीही संबंध नसतो.अपवाद हा की कोणा एका अभिनेत्रीचा सिनेमा तिथे दाखवला जाणार असेल तर ती अभिनेत्री हजर राहते. तर काही अभिनेत्री 'फॅशन फॉर रिलीफ' माध्यमातून पर्यावरण आणि मानवी कारणांसाठी फंड जमा करण्यासाठी तिथे जातात.

दरवर्षी हे ब्युटी प्रोडक्ट अभिनेत्रींना त्यांच्या प्रचारासाठी बोलावतात. तिथे गेल्यानंतर अभिनेत्री आपापल्या ब्रँड्सला प्रमोट करतात. रेड कार्पेटवर त्यांचं फोटोशूट होतं. जगभरातील माध्यमांचं त्यांच्याकडे लक्ष असतं.

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माने पदार्पण केले आहे. ती लॉरियल पॅरिसची ब्रँड अँबेसिडर आहे आणि हॉलिवूड अभिनेत्री केट विन्स्लेटसोबत कंपनीला प्रमोट करताना दिसणार आहे. तसंच मानुषी छिल्लर, सारा अली खान, मृणाल ठाकूर यांची देखील पहिलीच कान्सवारी आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेट लुकसाठी एक विशिष्ट थीमही ठरवलेली असते. शिवाय या फेस्टिव्हलमध्ये जर्नलिस्ट आणि फिल्म क्रिटिक्स देखील सहभागी होऊ शकतात. फेस्टिव्हलच्या तिकीटाची किंमत ५ लाख ते २० लाख रुपये इतकी असते.