रेखासोबत जोडलेलं नाव, ४ लग्न करुनही अभिनेत्याला मिळालं नाही खरं प्रेम; कमी वयातच घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:05 IST2026-02-13T16:59:27+5:302026-02-13T17:05:54+5:30
२ अफेअर, ४ लग्न करुनही एकटेपणा वाट्याला आला, बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयची हदयस्पर्शी गोष्ट

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना आपलेसे वाटणाऱ्या अभिनेत्यांमध्ये रुपेरी पडद्यावर अष्टपैलू कामगिरी करणारे अभिनेते म्हणजे विनोद मेहरा. १९७१ पासून ते १९९० पर्यंत १९ वर्षांमध्ये त्यांनी जवळपास १०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला.

रुपेरी पडद्यावर मुख्य नायकापासून ते सहाय्यक भूमिकांपर्यंत, चित्रपटांमध्ये कधी नायकाचा भाऊ, मित्र अशा विविधांगी सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिकांमध्ये आपली प्रतिभा दाखविणारे अभिनेते विनोद मेहरा यांचा आज १३ फेब्रुवारीला जन्मदिवस आहे.

विनोद मेहरा यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथेझाला. वडील परमेश्वरी दास व्यावसायिक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी व्यवसायासाठी अमृतसर सोडून मुंबई शहरात स्थायिक झाले.

विनोद मेहरा यांची आत्या शारदा यांना चित्रपटांतून अभिनय करण्याची प्रचंड हौस होती. त्यामुळे मुंबईत आल्यावर त्यांनी अनेक चित्रपटातून छोट्या छोट्या भूमिका साकारल्या.

यानंतर त्यांनी 'पतित पवन', 'शारदा' , 'दुनिया रंग रंगीली', 'बालयोगी उपमन्यु', 'रागिनी' , 'बेवकुफ' आणि 'अंगुलीमाल' या चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय साकारला.

दिग्दर्शक नजर पडली अन् मग...
एकदा मित्रांसोबत गेलार्ड रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतांना प्रसिद्ध दिग्दर्शक रूप के. शौरी यांनी विनोद यांना पाहिले. त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसला बोलवत त्यांना पहिला चित्रपट दिला. युवा नायक म्हणून १९७१ साली एक थी रिटा या चित्रपटातून विनोद मेहरा यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

विनोद मेहरा यांच्या फिल्म करियरला मौसमी चटर्जी यांच्यासोबतच्या शक्ती सामंत यांची फिल्म अनुराग (१९७२) ने कलाटणी दिली. हा चित्रपट समीक्षात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला आणि विनोद मेहरा यांना मुख्य अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत मान्यता मिळाली. अनुरागच्या यशावर स्वार होऊन हिफाजत ,दो फूल,जुर्म और सजा,आरोप,कुंवरा बाप, शानदार,हवस,फासला,उमरकैद रफ्तार ,दो खिलाड़ी,एक ही रास्ता या चित्रपटातून त्यांची कारकिर्द बहरत गेली.

विनोद मेहरा यांचे वैयक्तिक आयुष्य अशांत होते. त्यांनी चार वेळा लग्न केल्याचं म्हटलं जातं. परंतु त्याचं कोणतंही लग्न फार काळ टिकलं नाही. एलान चित्रपटाचे चित्रीकरणादरम्यान रेखा आणि विनोद मेहरा यांच्यातील जवळीक वाढली व त्यांनी १९७०च्या दशकात लग्न केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र,१९८८ मध्ये विनोद मेहरा यांनी केनिया येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक किरण यांच्याशी विवाह केला. १९८८ मध्येच त्यांची पहिली मुलगी सोनिया हिचा जन्म झाला. मात्र लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षांनी विनोद यांचे हृदयविकाराने निधन झाले.

















