'या' शायरीने होते 'दिलीपसाहब'च्या बायोग्राफी पुस्तकाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 08:50 AM2021-07-07T08:50:54+5:302021-07-07T09:01:17+5:30

अभिनयाची सुरुवात, दिलीप कुमार असे नामांतर, अमिताभ बच्चन, मधुबाला, सायरा बानो यांसह जेआरडी टाटा यांच्यापर्यंतच्या अनेक किस्स्यांना दिलीप कुमार यानी आपल्या बायोग्राफी पुस्तकात शब्दबद्ध केले आहे.

बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार उर्फ दिलीप साहब यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडच्या पहिल्या महानायकाची एक्झिट झाल्याने एका पर्वाचा अस्त झाला आहे, ते 98 वर्षांचे होते.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ अशा शब्दांत गौरवलेले तसेच ट्रॅजेडी किंग म्हणून प्रचलित असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे मुळचे पाकिस्तानमधील पेशावरचे.

या शहरातील क्‍युसा खवानी बाजारातील पास्तुन कुटुंबात 11 डिसेंबर 1922 साली दिलीप कुमार यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांचे वडील लाला गुलाम सरवर पेशावर व देवलाली येथील प्रसिद्ध फळविक्रेते होते.

दिलीप कुमार यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील देवलाली येथील प्रेस्टिजियस बर्नेस शाळेत झाले. 1930 साली त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. 1940मध्ये दिलीप कुमार पुण्यातील एका कॅन्टीनचे मालक व फळविक्रेते होते.

1943 साली बॉम्बे टॉकिजचे मालक आणि त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री देविका राणी आणि तिचा पती हिमांशु राय यांनी पुण्यातील सैन्य कॅन्टीनमध्ये दिलीप कुमार यांना पाहिले

त्यानंतर, 1944 सालातील ज्वार भाटा या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी दिलीप कुमार यांची निवड केली. हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट असून त्यानंतर त्यांनी कधीच पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

दिलीप कुमार यांच्या द सब्सटेंस एंड द शैडो (ऑटोबायोग्राफी) या इंग्रजी पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील पैलू उलगडण्यात आले आहेत. उदयतारा नायर यांनी हे पुस्तक लिहिले असून हे हाऊसने प्रकाशित केले आहे.

दिलीप कुमार यांनी दिलदारपणे बेलिमासल असं जीवन जगलंय, सार्वजनिक जीवनातही त्यांचा खास वावर होता. त्यामुळेच त्यांच्या जीवनावरील बायोग्राफी पुस्तकाची सुरुवातही त्यांनी एका शेरो-शायरीने केली आहे.

नोव्हेंबर 2014 मध्ये मुंबईत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. या पुस्तकात दिलीपसाहब यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगण्यात आले आहेत. सिनेजगतातील किस्स्यांनी भरलेला हा बॉलिवूडचा ऐवजच म्हणावं लागेल.

पुस्तकाची सुरुवातच त्यांनी एका शायरीने करताना वाचकांना, चाहत्यांनाच सवाल केला आहे. मुझे तो होश नहीं आप ही मशविरा दीजिए, कहां से छेड़ूं फसाना कहां तमाम करूं अशी सुरुवात त्यांनी बायोग्राफीची केली आहे.

अभिनयाची सुरुवात, दिलीप कुमार असे नामांतर, अमिताभ बच्चन, मधुबाला, सायरा बानो यांसह जेआरडी टाटा यांच्यापर्यंतच्या अनेक किस्स्यांना शब्दबद्ध केले आहे.