अभिनेत्रीनं सोशल मीडिया आयडीमध्ये जोडलं वडिलांचं नाव, म्हणाली "ही वेळ योग्य वाटली..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:08 IST2026-02-03T18:03:43+5:302026-02-03T18:08:44+5:30
अभिनेत्रीनं अधिकृत सोशल मीडिया हँडलवरीव नावामध्ये बदल केला असून, त्यामागचे एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक कारणही तिने स्पष्ट केले आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार नशिबाची साथ मिळावी म्हणून किंवा काही वैयक्तिक कारणांमुळे आपल्या नावाचं स्पेलिंग बदलतात किंवा नावच बदलतात.

अजय देवगण, रितेश देशमुख आणि कियारा अडवाणी यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी आपल्या नावामध्ये बदल केला आहे. या यादीत आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे.

ते म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर. तिनं तिच्या नावामागे वडिलांचं नाव जोडलं आहे. हा बदल केवळ कागदोपत्री किंवा सोशल मीडियापुरता मर्यादित नसून, त्यामागे एक अतिशय हळवं आणि भावनिक कारण दडलेलं आहे.

सोशल मीडिया युजर्सनी नुकतंच नोटीस केलं की, भूमीने तिच्या इंस्टाग्राम आयडीमध्ये बदल केला आहे. तिच्या इंस्टाग्राम आयडीमध्ये पूर्वी 'भूमी पेडणेकर' असं नाव लिहलेलं होतं. ते बदलून आता 'भूमी सतीश पेडणेकर' हे नाव दिसतंय.

स्क्रीनशी संवाद साधताना भूमीनं या बदलाचे कारण सांगितले. ती म्हणाली, "मला माझ्या वडिलांचे नाव लावायचे होते आणि त्यासाठी मला हीच वेळ योग्य वाटली. मी गेल्या अनेक दिवसांपासून याचा विचार करत होते.

पुढे तिनं सांगितलं, "वडिलांच्या निधनानंतर माझ्याकडे ते दुःख व्यक्त करण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता, तो वेळ मला गेल्या काही महिन्यांत मिळाला, जेव्हा मी फिल्म सेटवर नव्हते. ही माझ्यासाठी खूप वैयक्तिक गोष्ट आहे".

भूमीचे वडील सतीश मोतीराम पेडणेकर हे महाराष्ट्राचे माजी गृह आणि कामगार मंत्री होते. २०११ मध्ये त्यांचं कर्करोगाने निधन झालं. भूमीचं एक बहीण आणि आई, असं कुटुंब आहे.

भूमी पेडणेकर हिचे मूळ गाव गोव्यातील पेडणे (Pernem) हे आहे. तिचे आडनाव 'पेडणेकर' हे तिच्या मूळ गावावरून पडले आहे. तिचे वडिलोपार्जित घर गोव्यात आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं याबद्दल माहिती दिली होती.

भूमी पेडणेकर सध्या तिच्या 'दलदल' सीरिजमुळे चर्चेत आहे. 'द रॉयल्स' सीरिजच्या यशानंतर आता तिची ही क्राइम थ्रिलर सीरिज येत आहे.

'दलदल' यामध्ये भूमी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. २० जानेवारी रोजी प्राइमवर रिलीज होत आहे. तिच्यासोबत यामध्ये आदित्य रावल आणि समारा तिजोरीही आहेत. याचं दिग्दर्शन अमृत राज गुप्ता यांनी केलं आहे.

















