Femina Miss India 2023 : राजस्थानची नंदिनी गुप्ता ठरली 'मिस इंडिया' , जाणून घ्या कोण आहे ही ब्युटी क्वीन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 10:11 AM2023-04-16T10:11:18+5:302023-04-16T10:17:37+5:30

Femina Miss India 2023 : १० व्या वर्षी स्वप्न पाहिलं अन् १९ व्या वर्षी पूर्ण केलं...‘फेमिना मिस इंडिया’ नंदिनी गुप्ताचा असाही प्रवास...

५९ वा ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेचा ग्रँड फिनाले काल मणिपूर येथे संपन्न झाला आणि राजस्थानाची १९ वर्षीय नंदिनी गुप्ता हिने ‘मिस इंडिया २०२३’चा खिताब पटकावला. दिल्लीची श्रेया पूंजा फर्स्ट रनरअप तर मणिपूरची थुनाओजम स्ट्रेला लुवांग ही सेकंड रनरअप ठरली.

मणिपूरच्या इंफाळ येथे रंगलेल्या ‘फेमिना मिस इंडिया’ सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, नेहा धूपिया असे अनेक स्टार्स यावेळी हजर होते. आता जाणून घेऊ या नंदिनी गुप्ताबद्दल.

२०२३ चा मिस इंडिया खिताब पटकावणारी नंदिनी ही विद्यार्थीही आहे आणि मॉडेलही. बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये तिने पदवी मिळवली आहे. राजस्थानात तिचा जन्म झाला.

नंदिनी गुप्ता केवळ १९ वर्षांची आहे. लहानपणापासूनच अनेक स्पर्धांमध्ये भाग घेणारी नंदिनीचं मिस इंडिया बनायचं स्वप्न होतं आणि काल तिचं हे स्वप्न पूर्ण झालं.

वयाच्या १० व्या वर्षीच नंदिनीने ‘मिस इंडिया’ बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या कोवळ्या वयात मी भांडून का होईना मिस इंडियाचा मुकूट घेईलच, असं ती म्हणायची. पण जशी जशी मोठी झाली तशी हा केवळ मुकूट नसून त्यापेक्षा खूप काही असल्याची जाणीव तिला झाली.

नंदिनीना इंग्लिश येत नव्हतं. पण केवळ ७ महिन्यांत ती इंग्लिश शिकली. आता हीच नंदिनी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

काल रंगलेल्या ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेची सुरूवात मिस इंडियाच्या गत विजेत्या सिनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, मानसा वाराणसी, मान्या सिंग, सुमन राव, शिवानी जाधव यांच्या सादरीकरणाने झाली.

या स्पर्धेच्या फिनालेमध्ये फॅशन आणि मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अनेक मंडळी ही उपस्थित होती. या कार्यक्रमामध्ये कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांनी देखील परफॉर्म केलं.

या स्पर्धेचे परीक्षण नेहा धुपिया, बॉक्सर लैश्राम सरीता देवी, कोरिओग्राफर टेरेन्स, चित्रपट दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी आणि फॅशन डिझायनर्स रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांनी केलं.