"एक वडील या नात्यानं...", बाप-लेकाची ताटातूट पाहून अक्षय कुमार भावूक; धवनला दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 07:11 PM2023-12-28T19:11:37+5:302023-12-28T19:21:10+5:30

शिखर धवन त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमी चर्चेत असतो.

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिखर धवन सध्या चर्चेत आहे. अलीकडेच त्याने त्याच्या मुलाच्या वाढदिवशी एक भावनिक पोस्ट केली होती. याचाच दाखला देत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने धवनसाठी एक खास पोस्ट केली आहे.

शिखर धवन त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमी चर्चेत असतो. शिखर आणि त्याच्या पत्नीचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला.

अलीकडेच दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने धवनचा त्याची विभक्त पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला. न्यायाधीश हरीश कुमार यांनी धवनने आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाच्या अर्जात केलेले सर्व आरोप या आधारावर मान्य केले की पत्नी आयशा मुखर्जी स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरली. आयशाने धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

धवनने मुलासोबतच्या व्हिडीओ कॉलचा फोटो शेअर करत म्हटले होते, "मी तुला प्रत्यक्ष भेटून एक वर्ष झालं आहे आणि आता जवळपास तीन महिन्यांपासून मला सगळीकडून ब्लॉक केलं गेलं. त्यामुळे माझ्या बाळा, मी तुला इथूनच तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. मी तुझ्याशी थेट संपर्क साधू शकत नसलो तरी मी मनाने तुझ्या संपर्कात असेन. मला तुझा खूप अभिमान आहे आणि मला माहित आहे की तू खूप छान करत आहेस."

धवनने लेकासाठी आणखी लिहले की, बाळा तुझा बाबा नेहमी तुझी आठवण काढतो आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो नेहमी सकारात्मक असतो, देवाच्या कृपेने जेव्हा आपण पुन्हा भेटू या आशेने हसतमुखाने वाट पाहत असतो.

तसेच मस्ती कर, मजा कर पण विध्वंसक होऊ नको, नम्र, दयाळू, सहनशील आणि बलवान व्हो... तुला मी दिसत नाही, पण मी दररोज तुझ्यासाठी काहीतरी मेसेज लिहित असतो. तुझ्या भविष्याबद्दल सतत विचार करत असतो. तुझ्या बाबाकडून तुला खूप सारे प्रेम 'झोरा', असेही धवनने म्हटले होते.

गब्बरच्या पोस्टचा दाखला देत अक्षय कुमारने भावनिक विधान केले आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून म्हटले, "ही पोस्ट पाहून खरोखरच मन दुखावले. एक वडील या नात्याने मला माहीत आहे की तुझ्या मुलाला न बघता किंवा न भेटता जगणे यापेक्षा दु:खदायक काहीही नाही."

"पण, तू खंबीर राहा शिखर... माझ्यासहित लाखो लोक तुझी मुलासोबत भेट व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. देव आशीर्वाद देईलच", असेही अक्षय कुमारने नमूद केले.