कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 21:24 IST2025-09-25T20:54:18+5:302025-09-25T21:24:07+5:30

Amruta Fadnavis on Trolling: अनेक कारणांवरून आणि गोष्टींवरून अमृता फडणवीस यांना सातत्याने ट्रोल करण्यात येते.

लोकप्रिय गायिका, समाजसेविका आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांना वेळप्रसंगी ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. त्यांचे कार्य कौतुकास्पद होते. पण त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून त्यांना खूप ट्रोल करण्यात आले.

केवळ हेच नव्हे तर अनेक कारणांवरून आणि गोष्टींवरून अमृता यांना ट्रोल करण्यात येते. या ट्रोलिंगबाबत नुकतेच इंडियाटुडेच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी अतिशय रोखठोक मत व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, "माझ्याबाबतीत असं अनेकदा घडलंय की लोक अचानक ओव्हरअँक्टिव्ह होतात. ते सहसा अशा मुद्द्यांवरून ट्रोलिंग सुरू करतात, ज्याने मूळ मुद्द्यापासून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न असतो."

"गणपती विसर्जनानंतर जे झालं, त्यात आम्ही स्वच्छता करत होतो. लोक, एनजीओ आणि लहान मुलेही आमच्यासोबत स्वच्छता करत होते. आमचा हेतु हा होता पर्यावरणपूरक गणपती मूर्ति असाव्यात."

"पण ट्रोलर्सने काय प्रमोट केलं? त्यांनी वेगवेगळ्या अँगलने झूम करून आणि फोकस करून माझ्या कपड्यांविषयी चर्चा सुरू केली की, हे पाहा किती वेगळ्या प्रकारचे कपडे घातले आहेत"

"यात काय घडलं? मूळ मुद्द्यापासून लोकांचे लक्ष दुसरीकड वळवलं गेलं. ही ट्रोलिंग हँडल्स खूप वाईट आहेत. त्यांना याचे पैसे मिळतात आणि त्यानुसार ते लोक कामं करत असतात."

"ज्या महिलेकडे स्वत:ची समज आहे, स्वत:चा आवाज आहे, त्या महिलेच्या मागे हे ट्रोलर्स लागले आहेत. हे केवळ माझ्याबाबतीत नाही तर प्रत्येत स्वतंत्र महिलेच्या बाबतीत घडतंय."

"ट्रोलिंग हे बॅकग्राऊंड म्युझिक सारखं असतं. तो गोंगाट वाटू शकतो, त्याचा आनंद घेता येतो किंवा त्याकडे दुर्लक्षही करता येतं. तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवा," असे त्या म्हणाल्या.