कृती सेनन राहत असलेला डुप्लेक्स फ्लॅट अमिताभ बच्चननी विकला; किती कोटींचा नफा कमविला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:21 IST2025-01-20T18:45:55+5:302025-01-20T19:21:15+5:30

Amitabh Bachchan: अमिताभ यांनी २०२१ मध्ये मुंबईतील ओशिवारामध्ये डुप्लेक्स फ्लॅट घेतला होता. तो त्यांनी दर महिन्याला १० लाख एवढ्या मोठ्या रकमेने भाड्यानेही दिला होता. आता त्यांनी तो करोडो रुपयांना विकला आहे.

एकेकाळी कंगाल झालेले बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीच्या मदतीने पुन्हा परिस्थिती सुधारली आणि आता ते करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत.

अमिताभ यांनी २०२१ मध्ये मुंबईतील ओशिवारामध्ये डुप्लेक्स फ्लॅट घेतला होता. तो त्यांनी दर महिन्याला १० लाख एवढ्या मोठ्या रकमेने भाड्यानेही दिला होता. आता त्यांनी तो करोडो रुपयांना विकला आहे.

बच्चन यांचा क्रिस्टल ग्रुपच्या द अटलांटिसमध्ये हा फ्लॅट होता. तो त्यांनी अभिनेत्री कृती सेनन हिला भाड्याने दिला होता. त्यापोटी कृती सेनन त्यांना दर महिन्याला १० लाख रुपये देत होती. दर महिन्याला भरघोस उत्पन्न मिळवून देणारी संपत्ती अमिताभ यांनी या महिन्यातच विकली आहे.

बच्चन यांनी ही संपत्ती ८३ कोटी रुपयांना विकल्याचे सांगितले जात आहे. ही संपत्ती खरेदी करण्यासाठी खरेदीदाराने तब्बल ५ कोटी रुपयांची स्टँप ड्युटी मोजली आहे. तर रजिस्ट्रेशनसाठी ३० हजार रुपये लागले आहेत.

अमिताभ यांनी चार वर्षांत किती नफा कमविला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचे उत्तर खाली मिळणार आहे.

बच्चन यांनी एप्रिल २०२१ मध्ये हा डुप्लेक्स फ्लॅट ३१ कोटींना खरेदी केला होता. आयजीआरच्या वेबसाईटवर याची माहिती आहे.

चार वर्षांनी बच्चन यांनी हा फ्लॅट ८३ कोटी रुपये म्हणजेच ५२ कोटी रुपयांचा नफा कमवून विकला आहे. त्यात दर वर्षाला त्यांनी १.२ कोटी रुपयांचे भाडे कमविले ते वेगळेच आहे.

बच्चन यांच्या या डुप्लेक्स अपार्टमेंटचे क्षेत्रफळ अंदाजे ५२९.९४ चौरस मीटर आहे. कार्पेट एरिया ५,१८५.६२ चौरस मीटर आहे. त्यात ४४५.९३ चौरस मीटर एवढी मोठी टेरेसही आहे. सहा कार पार्किंगही आहेत.