अभिनयाला 'राम-राम' केला; आता कॉर्पोरेट जगतात नाव कमावतेय 'ही' अभिनेत्री, ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 17:53 IST2026-02-24T17:43:27+5:302026-02-24T17:53:11+5:30
ब्यूटी विथ ब्रेन! ग्लॅमर विश्वाला रामराम करत 'ही' अभिनेत्री आता कॉर्पोरेट जगात नावलौकिक मिळवत आहे.

अनेक गाजलेल्या अभिनेत्रींनी धर्मासाठी अभिनय क्षेत्र सोडल्याचं आपण ऐकलं आहे. त्यांनी अभिनयाची कारकीर्द सोडून अध्यात्म, व्यवसाय किंवा शेती यांसारख्या वेगळ्या क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

अशीच एक अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे. एकेकाळी अल्लू अर्जुन आणि प्रभाससारख्या सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री आता अभिनय सोडून एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.

ती आहे दीक्षा सेठ. दीक्षाला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. तिचे वडील कॉर्पोरेट क्षेत्रात असल्याने तिचे बालपण अनेक शहरांत गेले. तिला 'मरीन आर्किओलॉजी' (सागरी पुरातत्वशास्त्र) शिकून समुद्राच्या तळाशी असलेल्या अवशेषांचा शोध घ्यायचा होता.

मात्र, कॉलेजमध्ये असताना एका स्काऊटने तिला 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला दिला. तिथे तिने 'टॉप १०' मध्ये मजल मारली आणि तिचे नशीब पालटले.

हैदराबादमध्ये मॉडेलिंग करत असताना दिग्दर्शक क्रिश यांची नजर तिच्यावर पडली. ७० मुलींच्या ऑडिशननंतर 'वेदम' चित्रपटासाठी तिची निवड झाली. यात तिने अल्लू अर्जुनच्या प्रेयसीची भूमिका साकारली, जी प्रचंड गाजली.

दीक्षाने रवी तेजासोबत 'मिरपाकय', 'निप्पू' आणि प्रभाससोबत 'रेबेल' सारख्या मोठ्या चित्रपटांत काम केले.

दीक्षाने अभिनेत्री करिना कपूरच्या आत्याचा मुलगा अरमान जैनसोबत 'लेकर हम दिवाना दिल' मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

यशाच्या शिखरावर असताना दीक्षाने अभिनयाचा निरोप घेण्याचे ठरवले. तिने प्रतिष्ठित 'IESE बिझनेस स्कूल' मधून तिचे एमबीए पूर्ण केले. इंडस्ट्रीतील १० वर्षांचा अनुभव, ब्रँड्ससोबतचे काम आणि माध्यमांची जाण याचा वापर तिने व्यावसायिक क्षेत्रात केला.

दीक्षा सध्या ब्रिटनमधील एका प्रसिद्ध गेमिंग कंपनीत 'डिरेक्टर ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट अँड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स' या मोठ्या पदावर कार्यरत आहे.

ग्लॅमरस दुनियेनंतर आता कॉर्पोरेट जगतात दीक्षा स्थिरावली आहे.

















