'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:39 IST2025-11-24T16:33:53+5:302025-11-24T16:39:41+5:30

Dharmendra Death: अभिनेता धर्मेंद्र यांनी ४५० कोटींचे मोठे व्यावसायिक साम्राज्य उभे केले होते. रिअल इस्टेट, १०० एकरचा फार्महाऊस आणि गरम धरम रेस्टॉरंट्सच्या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे केवळ पडद्यावरचे 'ही-मॅन' नव्हते, तर ते एका यशस्वी उद्योगपती देखील होते.

८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असले तरी, त्यांनी बॉलीवूडसोबतच व्यावसायिक क्षेत्रातही एक मोठे साम्राज्य उभे केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती सुमारे ४५० कोटी रुपये होती. त्यांनी आपली कमाई केवळ चित्रपटांपुरती मर्यादित न ठेवता, ती हॉटेल व्यवसाय, रिअल इस्टेट, शेती आणि चित्रपट निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवली होती.

त्यांनी २०१५ मध्ये दिल्ली येथे आपल्या फिल्मी व्यक्तिरेखांवर आधारित 'गरम धरम ढाबा' उघडून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात पाऊल ठेवले.

या रेस्टॉरंटच्या यशानंतर, २०२२ मध्ये त्यांनी करनाल महामार्गावर त्यांच्या लोकप्रिय टोपणनावावरून 'ही-मॅन' नावाचे दुसरे रेस्टॉरंट सुरू केले.

त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा रिअल इस्टेटमध्ये गुंतलेला आहे. १०० एकरचा त्यांचा लोणावळा येथील आलिशान फार्महाऊस कोट्यवधी रुपयांचा आहे. याशिवाय, महाराष्ट्रात १७ कोटींहून अधिक किमतीची त्यांची अनेक घरे आणि शेतजमीन होती.

महत्त्वाचे म्हणजे, ते याच फार्महाऊसजवळ ३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बनवण्याची योजना आखत होते.

त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील चालवले, ज्यातून 'यमला पगला दीवाना' सारख्या चित्रपटांची निर्मिती झाली.